डिजिटल शिक्षणातून दर्जा उंचावण्याचा प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे यांची भावना

म्हसळा : नगर पंचायत हद्दीतील तीन प्राथमिक शाळांचे अद्ययावत डिजिटल शाळांमध्ये रूपांतर झाले असून, या शाळांचे लोकार्पण राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या उपक्रमामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा सावर, राजीप उर्दू शाळा आणि पीएम श्री प्राथमिक मराठी शाळा म्हसळा क्र. १ यांचा समावेश आहे. या शाळा RCF कंपनीच्या CSR निधीतून विकसित करण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, ज्येष्ठ नेते अंकुश खडस, मुस्लिम समाज अध्यक्ष नाजीम चोगले, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, पोलीस निरीक्षक संदीप कहाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “सामाजिक बांधिलकी जोपासताना आध्यात्म, परंपरा व संस्कृती यांच्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. नव्या डिजिटल सुविधांनी समृद्ध झालेल्या या शाळांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही खाजगी शाळांप्रमाणेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.”
या शाळांमध्ये शाळा इमारतींचे नूतनीकरण, आकर्षक रंगरंगोटी, स्वच्छतागृह, पाणी, वीज, पंखे, संगणक, प्रिंटर, डिजिटल बोर्ड, बेंच-टेबल, सीसीटीव्ही कॅमेरे यांसारख्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. “शाळेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून मीही भावूक झाले,” असे त्यांनी नमूद केले.
खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकारातून CSR निधीमधून क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राला प्राधान्य देण्यात आल्याचे सांगून मंत्री तटकरे यांनी पुढील टप्प्यात म्हसळा येथील आदिवासी वाड्या आणि आणखी दोन शाळा डिजिटल करण्याची घोषणा केली.
शेवटी, शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवावी आणि उपलब्ध डिजिटल साधनसंपत्तीचा दर्जेदार शिक्षणासाठी प्रभावी वापर करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.