ताज्या बातम्यारायगड
“जिल्हा आरोग्य अधिकारी कोण? – ‘पब्लिक’ला गेसिंग गेम खेळायला लावणारा कारभार!”
"जनतेच्या आरोग्याचा खेळ, आणि प्रशासनाचं मौन!"

रायगड : जिल्ह्याच्या आरोग्य विभागात सध्या ‘संगीत खुर्ची’चा खेळ रंगात आला आहे — आणि विशेष म्हणजे, वाद्यं वाजवण्याचं काम स्वतः जिल्हा प्रशासन करत आहे! जिल्हा आरोग्य अधिकारी कोण? निर्णय कुणाचा? आदेश कुणाचे? — या प्रश्नांची उत्तरं रोज बदलतात, अगदी हवामान अंदाजासारखी! डॉ. दयानंद सूर्यवंशी अधिकृत अधिकारी, पण प्रत्यक्षात कामं करतात डॉ. मनिषा विखे. कर्मचाऱ्यांचे आदेश वेगवेगळ्या दिशांनी येतात, आणि त्यांना कळत नाही की फाईल कुणाच्या सह्याने पुढे सरकवायची.
प्रशासन मात्र या गोंधळाकडे ‘हसत खेळत’ पाहतंय — जणू काही आरोग्य खातं नाही, तर एखादा टी.व्ही. सिरीयलचा सेट आहे! जिथं दर दिवशी नवीन ट्विस्ट, नवीन पात्र, आणि खुर्चीवर नवा कलाकार. फक्त फरक इतकाच की, या खेळात लोकांचं आरोग्य धोक्यात येतंय.
शासनाने नियुक्ती केली, अधिकार काढून घेतले, मॅटमध्ये सुनावणी सुरू आहे, आणि या सगळ्या गोंधळात ‘जनता’ आणि ‘सेवा’ कुठे हरवली याचं कोणालाच भान राहिलेलं नाही. एवढ्या महत्त्वाच्या पदावर असा खुला गोंधळ सुरू असताना, जिल्हा परिषदेला अजूनही ठोस निर्णय घ्यावा वाटत नाही, हेच सांगतं की या व्यवस्थेला लोकांच्या प्रश्नांशी काही घेणं-देणं उरलेलं नाही.
डॉ. दयानंद सूर्यवंशी यांची अधिकृत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत डॉ. मनिषा विखे या पदाची जबाबदारी पार पाडत असून, दोघेही वेगवेगळ्या स्तरावर सक्रिय असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. “नेमकं आदेश कुणाचे ऐकायचे?” असा प्रश्न आज कर्मचारी विचारत आहेत.
या परिस्थितीचा थेट परिणाम आरोग्य विभागाच्या कामकाजावर झाला असून, अनेक निर्णय रखडले आहेत. यामुळे जनतेला आरोग्यसेवा मिळण्यात अडथळे येत आहेत. विभागातील कर्मचारीही या अनिश्चिततेमुळे नाराज असून, काहींनी वरिष्ट अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत.
जिल्हा परिषदेने अद्याप यावर स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. दरम्यान, डॉ. मनिषा विखे यांचे सह्यांचे अधिकार नुकतेच काढून घेण्यात आले आहेत. त्यांनी ही कारवाई महाराष्ट्र प्रशासन न्यायाधिकरणाकडे (मॅट) आव्हान दिले असून, २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्या निकालानंतर यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. आरोग्य क्षेत्रातील ही ‘संगीत खुर्ची’ लवकर संपावी, अशी अपेक्षा आता केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांचीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याच्या जनतेची आहे.
…..
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले की, प्रकरण मॅटमध्ये असल्याने प्रशासन सध्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होणार नाही.