ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
जिजाऊ पुरस्कारावरून जयंत पाटील यांनी राजकीय ठिणगीला दिली हवा, थळ मतदारसंघात शेकाप विरुद्ध शिंदे गट असे थेट राजकीय युद्ध पेटवले
जिल्हा परिषद थळ मतदार संघातून सानिका सुरेश घरत यांना दिली उमेदवारी

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील थळ जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापले असून शेतकरी कामगार पक्ष आणि शिंदे गट यांच्यात थेट संघर्षाची ठिणगी पेटली आहे.
शेकापचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी आणि शिंदे गटाच्या उमेदवार मानसी दळवी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवत, जिजाऊ पुरस्कारावरून थेट वादाला तोंड फोडले आहे.
“राजमाता जिजाऊंनी सुसंस्कार शिकवले. त्या कधीही शिव्या देत नव्हत्या. आज कुणालाही जिजाऊ पुरस्कार मिळतोय, हे दुर्दैव आहे. अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळाल्याने जिजाऊंनाही वाईट वाटले असते,” अशी जहरी टीका जयंत पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्यावर केली.
थळ मतदारसंघात पहिला घाव – शेकापचा थेट राजकीय डाव

रविवारी (दि.18) अलिबाग येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या जाहीर सभेत शेकापने थळ मतदारसंघातून सानिका सुरेश घरत यांची उमेदवारी जाहीर करत शिंदे गटाला थेट आव्हान दिले. याच मतदारसंघातून शिंदे गटाच्या मानसी दळवी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने, हा निर्णय म्हणजे राजकीय शड्डू ठोकल्यासारखा मानला जात आहे. “आम्ही सुशिक्षित, चारित्र्यवान उमेदवार देत आहोत. थळ मतदारसंघ पुन्हा शेकापकडे आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घ्यावी,” असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. सानिका घरात या अतिशय नवख्या उमेदवार आहेत. त्यांची थेट लढत ही मानसी दळवी यांच्या बरोबर होणार आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मेहनत घ्यावे लागणार आहे.

जिजाऊ पुरस्कारावरून वादाची ठिणगी
काही दिवसांपूर्वी मानसी दळवी यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्यावरून जयंत पाटील यांनी केलेली “शिवराळ भाषा करणाऱ्यांना जिजाऊ पुरस्कार देणे म्हणजे पुरस्काराचाच अपमान” ही टीका शिंदे गटासाठी थेट आव्हान ठरली आहे. त्यामुळे आता शिंदे गटाकडून कसा पलटवार होतो, याकडे संपूर्ण रायगडचे लक्ष लागले आहे.

विकास विरुद्ध फलकबाजी–जयंत पाटीलांचा आणखी हल्ला
थळ-नवगाव परिसरातील विकासकामांचा उल्लेख करत जयंत पाटील म्हणाले की, नवगाव येथील सिमेंट काँक्रीट रस्ते, रिक्षा स्टँड परिसरातील रस्ते, वरसोली येथील बंधारा ही कामे शेकापच्या माध्यमातून मंजूर झाली, मात्र आम्ही कधी फलकबाजी केली नाही, विरोधक मात्र नारळ फोडण्यात पुढे असतात, असा टोला त्यांनी लगावला.
थळ ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप
जयंत पाटील यांनी आणखी एक मोठा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, थळ ग्रामपंचायतीला आरसीएफ कंपनीकडून साडेसात कोटी रुपयांची घरपट्टी मिळते. स्पेशल ऑडिट केल्यास संबंधितांविरोधात गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
थेट लढत – शेकाप विरुद्ध शिंदे गट
सानिका घरत या उच्चशिक्षित, लोकांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या उमेदवार असल्याचे सांगत शेकापने थळ मतदारसंघात नैतिकता, चारित्र्य आणि विकास विरुद्ध सत्तेची ताकद असा थेट सामना उभा केला आहे. दुसरीकडे, शिंदे गटाकडून मानसी दळवी यांच्या उमेदवारीमुळे ही लढत प्रतिष्ठेची आणि सत्तेची बनली आहे.
राजकीय रणसंग्रामाची नांदी
जिजाऊ पुरस्कारावरून सुरू झालेला वाद आता थळ मतदारसंघातील निवडणुकीत शेकाप विरुद्ध शिंदे गट असा थेट रणसंग्राम बनत आहे.
या संघर्षात पुढचा डाव कोणाचा आणि राजकीय पलटवार कसा होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




