ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

युवा महोत्सवात जे.एस.एम.चा डंका – १५ पारितोषिकांसह रायगड दक्षिण विभागाचे विजेतेपद


अलिबाग : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित 58 व्या रायगड (दक्षिण विभाग) युवा महोत्सवात जे. एस. एम. कॉलेजने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. महाविद्यालयातील ३३ विद्यार्थ्यांनी २५ स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून त्यापैकी तब्बल १५ स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवून जे.एस.एम.ने रायगड झोन चॅम्पियनशिप जिंकली.

ही जिल्हास्तरीय फेरी सोमवार, १८ ऑगस्ट रोजी अंजुमन-इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुड-जंजिरा येथे पार पडली.

जे.एस.एम.च्या विद्यार्थ्यांनी कोलाज, चित्रकला, पोस्टर मेकिंग, वकृत्व (मराठी), कथाकथन (हिंदी), वादविवाद (मराठी), एकांकिका (मराठी) व एकपात्री अभिनय (हिंदी) यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तर कथाकथन (मराठी), तालवाद्यवादन, मूकाभिनय व भारतीय समूहगीत गायनमध्ये द्वितीय क्रमांक, नाट्यसंगीतमध्ये तृतीय क्रमांक आणि वादविवाद (हिंदी/इंग्लिश), लोकनृत्य यामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

विशेष म्हणजे, कु. श्रेया अधिकारी (टी.वाय.बी.ए. मराठी) हिने पाच स्पर्धांमध्ये सहभाग घेत पाचही पारितोषिके पटकावली.

या यशाबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रवीण गायकवाड यांसह जिल्हा समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे व सांस्कृतिक समन्वयक प्रा. श्वेता पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यापीठस्तरीय अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामध्ये प्रा. डॉ. सिमंतीनी ठाकूर, प्रा. अश्विनी आठवले, प्रा. विनायक साळुंके, प्रा. हर्षला महाजन, प्रा. प्रीतम सातुपे, प्रा. सुरभी वाणी व प्रा. हिमांशू कुलकर्णी यांनी संघ व्यवस्थापक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. सांस्कृतिक समितीतील सर्व सहकारी प्राध्यापकांचे सहकार्यही या विजयामागे मोलाचे ठरले.


Related Articles

Back to top button