ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
गणेशोत्सवात ट्रक-ट्रेलरना बंदी… पण खड्ड्यांचे साम्राज्य कायम! NHAI–PWD झोपेत, कॉन्ट्रॅक्टर पैसे गिळून बेफिकीर
भाविकांसाठी ट्रक-ट्रेलरना नो-एन्ट्री, पण खड्ड्यांसाठी मात्र फ्री-एन्ट्रीच! 🔸 अब्जावधींचे ठेके, तरी महामार्ग ‘खड्डेमार्ग’च राहिला 🔸 अधिकारी झोपेत

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : मुंबई–गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालून भाविकांचा मार्ग मोकळा झाला आहे, पण खड्ड्यांचे विघ्न अजूनही तसंच आहे. NHAI, PWD आणि संबंधित कंत्राटदारांचे निकृष्ट काम व ढिम्म गती हीच खरी अडचण आहे.
अब्जावधींची कामं कंत्राटदारांना देऊनही, वर्षानुवर्षं रुंदीकरण हा ‘कोऱ्या कागदावरचा स्वप्नप्रकल्प’ ठरला. अधिकारी केवळ फाईल ढकलण्यात व्यस्त; कंत्राटदार मात्र पैसे गिळून रस्त्यावर डांबराऐवजी डोळ्यात धूळ फेकतायत.
भाविकांना त्रास, वाहनचालकांना अपघाताचा धोका आणि जनतेला कायमचा त्रागा – तरीही जबाबदारांवर कारवाई शून्य! ट्रक-ट्रेलर हटवून प्रशासनाने पाट्या टाकल्या खऱ्या, पण महामार्ग खड्डेमुक्त करणे ही त्यांची खरी जबाबदारी आहे. तोपर्यंत प्रत्येक गाडीखालील धक्का आणि प्रत्येक भाविकाच्या तोंडून येणारी शिवी हा NHAI–PWD आणि कॉन्ट्रॅक्टरांसाठी महाप्रसाद ठरणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टनांपेक्षा जास्त क्षमतेच्या ट्रक, ट्रेलर, मल्टी-अॅक्सल व इतर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल निलेश धोटे यांनी जारी केला आहे.
बंदीची अंमलबजावणी खालील कालावधीत
23 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 00.01 ते 28 ऑगस्ट रात्री 11.00 वाजेपर्यंत
31 ऑगस्ट रोजी सकाळी 8.00 ते रात्री 11.00 वाजेपर्यंत
02 सप्टेंबर रोजी सकाळी 8.00 ते रात्री 11.00 वाजेपर्यंत
06 सप्टेंबर सकाळी 8.00 ते 07 सप्टेंबर रात्री 8.00 वाजेपर्यंत
सूट असलेली वाहने
जेएनपीटी व जयगड बंदरांवरील आयात-निर्यात मालवाहतूक
दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन
अन्नधान्य, भाजीपाला व नाशवंत वस्तू वाहतूक करणारी वाहने
महामार्ग रुंदीकरण/दुरुस्तीच्या साहित्याची वाहतूक
तथापि, सूट मिळालेल्या वाहनांसाठी प्रवेशपत्र घेणे बंधनकारक असेल.




