ताज्या बातम्यामहाराष्ट्ररायगड
गणेशोत्सवाच्या नावाखाली ‘खड्ड्यांचं सरकार’ पुन्हा एकदा मैदानात!
सरकार आणि प्रशासनाचे दौरे सुरू; प्रत्यक्षात जनता रोज मृत्यूच्या खड्ड्यांतून प्रवास करते

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : लोकांचे प्राण धोक्यात असताना सरकारच्या योजनांचं ‘डांबर’ अजूनही सुकत नाही — मुंबई-गोवा महामार्ग पाहणी म्हणजे लोकांच्या सहनशीलतेची थट्टा! रस्ते खड्डेमुक्त नाहीत, सरकार जबाबदारीमुक्त आहे, आणि मंत्री मात्र आश्वासनं देण्यात पारंगत झालेत. चाकरमान्यांना दरवर्षी या खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. आणि वर त्याच खड्ड्यांवर बसून मंत्री स्वप्नांचे महाल उभे करतात!
चाकरमान्यांच्या सोयीसाठी नाही, तर कॅमेऱ्यासमोर पोझ देण्यासाठीच जणू महामार्गावर मंत्र्यांचा पाहणी दौरा झाला. प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाच्या आधीच हेच नाटक, तीच स्क्रिप्ट, तेच खोटं आश्वासन – “खड्डेमुक्त रस्ता”! प्रत्यक्षात महामार्गाच्या नावाने जनता पुरती फसलेली, आणि प्रशासन पुन्हा एकदा ‘कातडी वाचवण्याच्या’ मोडमध्ये!
गणेशोत्सवाच्या तोंडावर नेहमीप्रमाणे मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याची ग्वाही देत मंत्री आणि अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा दौऱ्याचा फार्स केल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात महामार्गाची दयनीय अवस्था बदलल्याची चिन्हं मात्र कुठेच नाहीत.

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आज पळस्पे ते कशेडी बोगदा दरम्यानच्या रस्त्याची पाहणी दौऱ्यावर होते. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये यासाठी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा शासनाचा मानस आहे, अशी नेहमीचीच घोषणा त्यांनी केली.
पळस्पे फाट्यापासून सुरू झालेल्या पाहणी दौऱ्यात आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रविंद्र पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, सीईओ नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एम.एन. राजभोज, अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, NHAI चे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महाड विश्रामगृहात घेतलेल्या आढावा बैठकीत मंत्री भोसले यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना वेळेत आणि दर्जेदार कामे करण्याच्या सूचना केल्या. त्यांनी इंदापूर व माणगाव बायपास पुलांच्या कामासाठी नव्या ठेकेदारांची नेमणूक झाल्याची माहिती दिली. मात्र, ही कामे पूर्ण व्हायला किमान एक वर्ष लागणार असल्याचेही कबूल केले.
मुंबई-गोवा महामार्गावर पुलांचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यायी सेवा रस्त्यांवर वाहतूक सुरळीत ठेवण्याचा आणि आवश्यक ठिकाणी साईन बोर्ड, रिफ्लेक्टर बसवण्याचा देखील दावा केला गेला. कोकणात जाणारे पर्यायी मार्ग (खोपोली-पाली) सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या, तसेच वडखळ-अलिबाग रस्त्याची दुरुस्ती, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व होमगार्ड्सच्या मदतीचे आश्वासन देण्यात आले.
पळस्पे, पेण, वाशी नाका, गडब, खारपाले, कोलेटी या ठिकाणी पाहणी करताना मंत्री भोसले यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरण केलं. या पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर शासकीय यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.
मात्र, प्रश्न इतकाच — वर्षानुवर्षं हेच दौरे, तीच भाषणे, तेच आश्वासने… तरीही कोकणाच्या वाटेवरील रस्ते आणि खड्ड्यांचे नाते सुटायचं नाव घेत नाही. यंदा तरी चाकरमान्यांच्या सहनशीलतेची परीक्षा थांबणार का?