क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

क्रिकेट मैदानावर रायगडच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री – पंच म्हणून नवा अध्याय

उरण येथे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर - २० सप्टेंबरला लेखी, तोंडी आणि प्रत्येक्षिक पंच परीक्षा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : क्रिकेट म्हटले की पुरुषांचीच मक्तेदारी अशी धारणा होती. पण काळ बदलला आहे. खेळाडू म्हणूनच नाही तर पंचकीच्या निर्णायक भूमिकेतही महिला आता आपली दमदार उपस्थिती नोंदवू लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील तरुणींना या नव्या वाटचालीची संधी देण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (RDCA) तर्फे उरण येथे महिलांसाठी पंच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) वतीने जिल्हा पातळीवर पंचकीचा दर्जा उंचावण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ते जिल्हा स्तरापर्यंत महिला पंचांचे योगदान वाढत असताना रायगडमध्येही महिलांना पंचकीची संधी मिळावी हा या शिबिराचा उद्देश होता.
उरण येथील डी.के. भोईर यांच्या माऊली हॉल येथे झालेल्या या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीसीसीआयचे पंच व माजी रणजीपटू हर्षद रावले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांना क्रिकेट नियम तज्ञ नयन कट्टा, तसेच एमसीए पॅनलचे पंच विघ्नहर्ता मुंढे, रोहन पाटील, प्रशांत माळी यांची साथ लाभली. उरण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य केशरीनाथ म्हात्रे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
या प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्ह्यातील महिला क्रिकेटपटू श्रुती अडित, अस्मिता गोवारी, साची बेलोसे, गार्गी साळुंखे यांनी उत्साहाने सहभाग घेतला. महिलांसाठीची पंच परीक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून ही परीक्षा लेखी, तोंडी आणि प्रत्येक्षिक अशा तीन टप्प्यात होणार आहे.
कार्यक्रमाला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश पाटील यांनी हजेरी लावून प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. तसेच शिबिरासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल डी.के. भोईर यांचे आभार मानले. आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी महिला उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील मुलींनी पंच बनवण्याच्या आव्हानात्मक क्षेत्रात पाऊल टाकल्यामुळे त्यांना नवी दिशा मिळणार असून, क्रिकेट क्षेत्रातील महिलांचा सहभाग अधिक सक्षम आणि प्रभावी होणार आहे.

Related Articles

Back to top button