वादानंतर ‘खालिद का शिवाजी’च्या प्रदर्शनावर एक महिन्याची स्थगिती
हिंदुत्ववादी संघटनांचा तीव्र आक्षेप; सेन्सॉर प्रमाणपत्र एक महिन्यासाठी रद्द, चौकशी सुरु

रायगड : ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावरून गेल्या काही दिवसांपासून उसळलेला वाद अखेर सरकारच्या दारात पोहोचला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या इतिहासाबाबत चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटावर थेट बंदीची मागणी केली होती.
आज (8 ऑगस्ट) मोठ्या थाटामाटात थिएटरमध्ये दाखल होणाऱ्या या चित्रपटाला सरकारने तात्काळ ब्रेक लावला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र एक महिन्यासाठी निलंबित करत चौकशीचे आदेश दिले आहेत. या कालावधीत प्रदर्शनावर पूर्ण स्थगिती राहील.
राज्य सरकारने केंद्रीय मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात, चित्रपटातील ऐतिहासिक विकृती आणि आगामी सणासुदीच्या काळात कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचा धोका असल्याची स्पष्ट नोंद केली आहे. सांस्कृतिक विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी चित्रपटाचे पुनर्परीक्षण करण्याची औपचारिक मागणी केली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज प्रीतम मोरे यांच्या दिग्दर्शनाखालील हा चित्रपट एका मुस्लिम युवकाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाचा शोध घेणाऱ्या प्रवासावर आधारित आहे. मात्र, वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाचं भवितव्य आता चौकशीच्या टेबलावर आहे.
राज मोरे यांनी प्रतिक्रिया देताना, “आम्ही पुढील कायदेशीर पावलं उचलू,” असा ठाम इशारा दिला आहे.