ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
कोकणाचा सुवर्णहंगाम सुरू! अलिबागचा पहिला हापूस वाशी एपीएमसीत; गौरव पाटील ठरले ‘पहिल्या पेटी’चे मानकरी

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : कोकणच्या मातीतून आलेला आणि चवीसाठी देशभरात ओळखला जाणारा अलिबागचा हापूस आंबा यंदाच्या हंगामात सर्वप्रथम वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथील आंबा उत्पादक शेतकरी गौरव शंकर पाटील यांच्या बागेतील आंब्याच्या दोन पेट्या वाशी एपीएमसी बाजारात पोहोचल्या असून, या हंगामातील पहिली आंब्याची पेटी पाठविण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
अलिबागचा हापूस आंबा स्थानिक ग्राहकांसह पर्यटकांच्या विशेष पसंतीचा असून, वाशी एपीएमसीमार्फत हा आंबा देश-विदेशातही पोहोचतो. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील आंब्याला मोठी मागणी असते. भातशेतीसोबत आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, विशेषतः तरुण शेतकरी आधुनिक पद्धतीने आंबा शेतीकडे वळताना दिसत आहेत.
यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाने हजेरी लावल्यामुळे आंबा पिकासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी फवारणी व निगा राखल्यामुळे आंब्याची झाडे सुरक्षित राहिली. या कठीण हवामानातही गौरव पाटील यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणजेच यंदाच्या हंगामातील पहिली आंब्याची पेटी बाजारात दाखल होऊ शकली.
वाशी येथील एपीएमसी बाजारात दोन पेट्या आंबा दाखल झाल्याची माहिती देताना गौरव पाटील म्हणाले,
“मी गेल्या अनेक वर्षांपासून आंबा शेती करत आहे. यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने मोठे आव्हान होते. तरीही योग्य देखभाल आणि मेहनतीमुळे आंबा लवकर तयार झाला. या हंगामातील पहिली आंब्याची पेटी वाशी एपीएमसीला पाठविता आली, याचा मला खूप आनंद आहे.”
या यशामुळे अलिबाग तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, येत्या काळात हापूस आंब्याच्या आवक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.




