कबड्डीच्या मैदानावर सागरी सुरक्षेचा ‘टीमवर्क’! पोलीस, सागरी सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधवांच्या समन्वयाला क्रीडेतून बळ
पुरुष-महिला विभागात पोयनाड पोलीस स्टेशनचा दबदबा अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांची लक्षवेधी उपस्थिती

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
समुद्राची सुरक्षा केवळ गस्त, बोटी आणि यंत्रणांमुळे होत नाही; संकटाच्या क्षणी कोण आधी प्रतिसाद देतो, कोण माहिती पोहोचवतो आणि कोण कोणाच्या मदतीला धावून जातो, यावरही ती अवलंबून असते. याच समन्वयाचा अनोखा धडा अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर कबड्डीच्या मैदानातून देण्यात आला.
पुरुष विभागात पोयनाड पोलीस स्टेशनने प्रथम क्रमांक पटकावला. वडखळ पोलीस स्टेशनला द्वितीय तर श्रीवर्धन पोलीस स्टेशनला तृतीय क्रमांक मिळाला. महिला विभागातही पोयनाड पोलीस स्टेशनने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. मांडवा पोलीस स्टेशन द्वितीय तर दिघी सागरी पोलीस स्टेशन तृतीय ठरले.
अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांची उपस्थिती यावेळी लक्षवेधी ठरली. सागरी सुरक्षा, पर्यटन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या उपक्रमाला उपस्थित राहून त्यांनी खेळाडूंचा उत्साह वाढविला.

सागरी सुरक्षेसाठी पोलीस दल, सागरी सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधव यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा २०२६ (पर्व दुसरे)’ची सांगता शनिवारी उत्साहात झाली.
मांडवा सागरी, रेवदंडा, मुरूड आणि दिघी सागरी या ठिकाणी साखळी पद्धतीने झालेल्या पुरुष व महिला विभागातील सामन्यांनंतर अलिबाग मुख्य समुद्रकिनारी अंतिम दिवसाचे सामने पार पडले. कबड्डीतील झटपट निर्णय, एकमेकांना दिलेली साथ आणि प्रतिस्पर्ध्याच्या हालचालीचा अचूक अंदाज हे गुण सागरी सुरक्षेच्या कामातही तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश या स्पर्धेतून अधोरेखित झाला.
विशेष म्हणजे, ही स्पर्धा केवळ पोलिसांच्या क्रीडा कौशल्याची चाचणी न ठरता किनारपट्टीवरील विविध सुरक्षा यंत्रणांना एका मैदानावर आणणारा संवादाचा मंच ठरली. समुद्रात एखादी दुर्घटना घडल्यास पोलीस दल, सागरी सुरक्षा रक्षक आणि स्थानिक कोळी बांधव यांच्यातील तातडीचा समन्वय किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव या उपक्रमातून अधिक ठळक झाली.
या कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अलिबाग उपनगराध्यक्षा ऍडव्होकेट मानसी म्हात्रे, सभापती प्रशांत नाईक व ऋषिकेश माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शाहीर शिवडीकर (पापलेटवाली फेम गायक) आणि राजेश हार्डे (वेसावकर फेम) यांनीही उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढविला.
समुद्राच्या लाटांशी रोज सामना करणाऱ्या रायगडमध्ये सुरक्षेची ‘टीम’ किती मजबूत आहे, हे दाखवणारा हा उपक्रम ठरला. मैदानावरची एकजूट उद्या समुद्रातील संकटाच्या वेळीही तितक्याच वेगाने कामाला यावी, हाच या स्पर्धेचा खरा संदेश ठरला.
……




