क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

एमसीए आयोजित मुलींची क्रिकेट स्पर्धा : रायगडच्या रणरागिणींची झुंजार कामगिरी, सुपर लिगमध्ये दिमाखदार प्रवेश


           सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
           क्रीडा प्रतिनिधी 

रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित एकोणीस वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय ५० षटकांच्या आंतरजिल्हा निमंत्रित संघांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रायगडच्या मुलींच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी करत सुपर लिगमध्ये दिमाखदार प्रवेश मिळवला आहे.
पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या अटीतटीच्या सामन्यात रायगडच्या संघाने सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघावर एक गडी राखून थरारक विजय मिळवला. या निर्णायक सामन्यासाठी रायगड जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने मैदानावर उपस्थित होते.
अखेरच्या क्षणी रायगडला विजयासाठी १० धावांची गरज असताना साताऱ्याला केवळ एक विकेट हवी होती. अशा तणावपूर्ण क्षणी समिधा तांडेल आणि स्वरा भगत यांनी जबाबदारी स्वीकारत मैदानावर ठामपणे उभे राहत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. समिधा तांडेल हिने महत्त्वपूर्ण चौकार ठोकत सामना रायगडच्या बाजूने वळवला, तर अखेरच्या चेंडूंमध्ये पेणची स्वरा शेखर भगत हिने आपल्या घरच्या मैदानावर विजयी चौकार मारत रायगडच्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. विजय मिळताच मैदानावर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या साताऱ्याच्या संघाने ३९.२ षटकांत सर्वबाद १३५ धावा केल्या. आर्या फडतरे हिने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. रायगडच्या गोलंदाजांकडून वेदिका तेटगुरे हिने ४, समिधा तांडेल हिने ३ तर स्वरा खेडेकर हिने २ बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली.
१३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रायगडच्या संघाने ४५.२ षटकांत ९ गडी गमावत १३८ धावा करत विजय मिळवला. सलामीवीर भ्रतती राय हिने ४९ धावांची संयमी आणि तडाखेबाज खेळी केली, तर संस्कृती पालकर हिने ३० धावांची मोलाची साथ दिली. शेवटच्या विकेटसाठी समिधा तांडेल आणि स्वरा भगत यांनी जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या निर्णायक धावा काढत संघाला सुपर लिगमध्ये पोहोचवले.
या विजयासह रायगडच्या मुलींच्या संघाने साखळी फेरीतील पाच पैकी चार सामने जिंकत सुपर लिगसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे.
सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेले रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी रायगडच्या सर्व लढवय्या मुलींचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. मुलांच्या बरोबरीने मुलीही उत्तम खेळाचे प्रदर्शन करत असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याआधी रायगडचा चौदा वर्षांखालील मुलांचा संघही एमसीएच्या सुपर लिगसाठी पात्र ठरला असून आता एकोणीस वर्षांखालील मुलींच्या संघानेही ही कामगिरी करत रायगड क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. रायगडची अष्टपैलू खेळाडू रोशनी पारधी हिची महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात निवड झाल्याने जिल्ह्याचा गौरव आणखी वाढला आहे.
नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आल्यानंतर गेल्या दीड वर्षांत प्रत्येक वयोगटातील निवड चाचणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून जवळपास ६०० सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. रायगडच्या खेळाडूंना अधिकाधिक संधी, दर्जेदार मार्गदर्शन आणि सक्षम व्यासपीठ देण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी स्पष्ट केले.


Related Articles

Back to top button