ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

एमपीएससीच्या आंदोलनात ‘रायगड पॅटर्न ’; विद्यार्थ्यांच्या लढ्याला शेकापचे संघटनात्मक बळ–चित्रलेखा पाटील

सरकारने विद्यार्थ्यांचा संयम आणखी तपासू नये; न्याय मिळेपर्यंत शेकाप मैदानात राहणार


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
पुणे |
आंदोलनातून प्रश्न लावून धरणे, जनतेला संघटित करणे आणि सत्तेला निर्णय घेण्यास भाग पाडणे, ही शेतकरी कामगार पक्षाची रायगडमध्ये रुजलेली संघर्षाची परंपरा आता एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात चर्चेचा विषय ठरली आहे. याच ‘रायगड पॅटर्न ’च्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या लढ्याला संघटनात्मक ताकद देण्याची भूमिका शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी घेतली आहे.
पुण्यात एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला बुधवारी चित्रलेखा पाटील यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देतानाच, हा लढा अधिक व्यापक आणि संघटित करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली.“एमपीएससीच्या लाखो विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शेतकरी कामगार पक्ष ढाल बनून उभा राहील. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत सरकारला जाब विचारत राहू,” अशी स्पष्ट भूमिका पाटील यांनी मांडली.
शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर शेकापने आंदोलनांच्या माध्यमातून अनेक लढे उभे केले आहेत. केवळ निवेदने आणि चर्चांपुरता संघर्ष मर्यादित न ठेवता जनतेला संघटित करून रस्त्यावर उतरविणे आणि मागण्यांचा पाठपुरावा करणे, ही शेकापची संघर्षशैली राहिली आहे. याच अनुभवाची आणि संघटनशक्तीची जोड आता एमपीएससी विद्यार्थ्यांच्या लढ्याला मिळत असल्याने आंदोलनकर्त्यांसाठी हा पाठिंबा नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास देणारा ठरण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. पारदर्शक प्रशासनाची मागणी घेऊन सुरू असलेल्या या सत्याग्रहाची सरकारने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावण्याऐवजी सरकारने आंदोलनस्थळी येऊन त्यांच्याशी संवाद साधावा आणि याच ठिकाणी निर्णय घ्यावा, अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली.
अन्यायाविरोधात आवाज उठविणे हा आमचा हक्क आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
रायगडच्या राजकीय-सामाजिक चळवळीशी जोडलेला शेतकरी कामगार पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून आपली ताकद सिद्ध करत आला आहे. खोतांविरोधातील लढा असो, सेझविरोधातील संघर्ष असो किंवा शेतकरी-कष्टकरी आणि कामगारांच्या हक्कांचे प्रश्न असोत, शेकापने रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. आता रायगडच्या या संघर्षपरंपरेची सांगड पुण्यातील तरुणाईच्या प्रश्नाशी घालण्याचे काम चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून होत असल्याचे चित्र एमपीएससी आंदोलनाच्या निमित्ताने दिसून आले.
लाखो कार्यकर्ते मैदानात उतरविण्याची ताकद
यावेळी आमदार रोहित पवार यांनीही शेकापच्या भूमिकेचे कौतुक केले. शेतकरी कामगार पक्ष हा आक्रमक पक्ष असून त्याने अनेक यशस्वी आंदोलने केली आहेत. वेळ पडल्यास लाखो कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे करण्याची ताकद शेकापमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा लढा हा केवळ परीक्षेपुरता किंवा काही मागण्यांपुरता मर्यादित नसून पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाच्या मागणीचा संघर्ष आहे. त्यामुळे या आंदोलनाला संघटनात्मक ताकद मिळाल्यास सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आंदोलनस्थळी शेकापच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या प्रमुख साम्या कोरडे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
……

Related Articles

Back to top button