ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

ऊर्जा समीकरण बदलतंय! भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली, अमेरिकेकडून वाढ

अमेरिकेचा दबाव वाढताच भारताने रशियाकडून तेल खरेदीत घेतली माघार?


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
नवी दिल्ली : रशियाकडून होणारी भारताची तेल खरेदी कमी होत असल्याची नोंद आहे, आणि यामागे अमेरिकेचा वाढता राजनैतिक दबाव ही प्रमुख पार्श्वभूमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून वॉशिंग्टनने नवी दिल्लीवर स्पष्ट संदेश दिला आहे. “रशियाकडून इंधन खरेदी थांबवा, अन्यथा व्यापार संबंधांवर परिणाम होईल.”
व्हाईट हाऊसचे व्यापारी सल्लागार पीटर नवारो यांनी तर थेट टीका करत भारतावर आरोप केला होता की, “रशियाकडून कच्चे इंधन विकत घेऊन भारत अप्रत्यक्षपणे युक्रेन युद्धाला निधी पुरवत आहे.”
अमेरिकेने अलीकडे भारतीय वस्तूंवरील टॅरिफ दुप्पट केला आहे. तज्ञांच्या मते, हा निर्णय भारतावर अप्रत्यक्ष दबाव आणणारा आहे. परिणामी, भारत सरकारने रशियाकडून होणाऱ्या आयातीचे प्रमाण मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळत आहेत.
अमेरिकेचे व्यापार सचिव स्कॉट बेसेंट यांनी स्पष्ट सांगितले होते की, “भारताला आपल्या तेल खरेदीत संतुलन साधावे लागेल. अमेरिकेकडून जास्त आणि रशियाकडून कमी.”
सप्टेंबर महिन्यात भारताने रशियाकडून सरासरी १.६ मिलियन बॅरल प्रतिदिन तेल खरेदी केली. ही गेल्या सप्टेंबरच्या तुलनेत १४ टक्क्यांनी कमी आहे.
दुसरीकडे, अमेरिकेकडून आयात ६.८ टक्क्यांनी वाढून २.१३ लाख बॅरल प्रतिदिन झाली आहे.
या बदलामुळे भारताच्या एकूण इंधन आयातीत रशियाचा हिस्सा ४० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांवर आला आहे, तर मध्यपूर्वेकडील पुरवठादारांचा हिस्सा ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
ऊर्जा सुरक्षेचा समतोल राखताना भारताने पुन्हा पारंपारिक पुरवठादारांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचा वाढता दबाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या समीकरणांमुळे भारत आता आपल्या आयात धोरणात धोरणात्मक पुनर्रचना करत आहे.
तज्ञांच्या मते, हा बदल केवळ आर्थिक नाही, तर भारत-अमेरिका संबंधांच्या नव्या टप्प्याची सुरुवात ठरू शकतो.

Related Articles

Back to top button