क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

उलवेत दणाणली कबड्डीची रणधुमाळी; रायगड अजिंक्यपदावर ओमकार वेश्वी व कर्नाळा अकॅडमीची मोहोर! 

१२८ पुरुष व ३२ महिला संघांचा थरार; रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी निमित्त रंगला जल्लोष, मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव


सत्यमेव जयते न्यू डॉट कॉम 
पनवेल  |
रायगडच्या मातीतील दमदार चढाया, अचूक पकडी आणि प्रेक्षकांच्या कडकडाटात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदान अक्षरशः दणाणून गेले! माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात ओमकार वेश्वी तर महिला गटात कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघाने दिमाखदार विजय संपादन केला.
ही स्पर्धा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रंगली. २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील तब्बल १२८ पुरुष व ३२ महिला संघांनी सहभाग नोंदवला. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात ओमकार वेश्वी संघाने शिवाई बांधण संघावर मात करत अजिंक्यपद पटकावले, तर शिवाई बांधण संघ उपविजेता ठरला. जय बजरंग रोहा यांनी तृतीय, तर जयभवानी वाशी पेण यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. महिला गटात कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघाने विजेतेपद मिळवले असून पनवेल स्पोर्टस् क्लब उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक ओमकार वेश्वी, तर चतुर्थ क्रमांक दत्तात्रेय क्रीडा पनवेल संघाने मिळवला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील स्पर्धा संयोजन समिती व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी जनरल सेक्रेटरी अॅड. आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. पंचांची निष्पक्ष कामगिरी, खेळाडूंचा उत्कृष्ठ खेळ व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध व जल्लोषमय वातावरणात पार पडली. पारितोषिक वितरण सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला असून विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. या निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार व अभीष्टचिंतन करण्यात आले. समाजकार्यातील त्यांच्या पाच दशकांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना सलाम केला. तसेच कबड्डी या मातीतल्या खेळाशी अतूट नाते असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व कबड्डीचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.

Related Articles

Back to top button