ताज्या बातम्यारायगड
उद्योगपती गजेंद्र दळी यांचे निधन – अलिबागने एक दूरदृष्टीचा समाजसेवक गमावला

अलिबाग : अलिबागचे सुपुत्र, यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक गजेंद्र दळी यांचे रविवारी (दि. २७ जुलै) वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अलिबागच्या सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
ओम-ब्रह्मा-विष्णू-महेश सिनेप्लेक्सचे संस्थापक म्हणून ते परिचित होते. परंतु त्यांनी केलेले सामाजिक कार्य देखील लक्षणीय होते.
गजेंद्र दळी यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील घाटरोळ (ता. लांजा) येथील. पुढे ते कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाले. नंतर अलिबागमध्ये पान आणि विडी व्यवसाय सुरू केला. व्यवसायात यश मिळवून त्यांनी १९७० साली ‘महेश चित्रमंदिर’ या चित्रपटगृहाची स्थापना केली. सुरुवातीस हे एक ओपन थिएटर होते, जे नंतर रूपांतरित होऊन स्थायिक थिएटर झाले. आज ते ओम -ब्रह्मा-विष्णू-महेश सिनेप्लेक्स म्हणून अलिबागकरांच्या मनोरंजनाचे प्रमुख केंद्र बनले आहे.
गजुभाऊंनी आपल्या आयुष्यात ४२ देशांचा प्रवास केला होता. ते फक्त एक उद्योजक नव्हते, तर एक संवेदनशील समाजसेवक म्हणूनही ओळखले जात. ज्येष्ठ नागरिक संघटना, लायन्स क्लब, आणि लायन्स हेल्थ फाउंडेशनमध्ये त्यांची सक्रीय भूमिका होती.
त्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी १० लाखांची मदत केली होती. १०४ आदिवासी जोडप्यांचे सामूहिक विवाह लावून त्यांनी अनेक गरजूंच्या आयुष्यात आनंद आणला होता.
त्यांना विविध पुरस्कार देखील मिळाले होते. त्यांच्या मागे पत्नी सुधा, दोन पुत्र सत्यजीत व विश्वजीत, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे. गजुभाऊंच्या निधनाने अलिबागने एक दूरदृष्टीचा उद्योजक आणि समर्पित समाजसेवक गमावला आहे.
…..