ताज्या बातम्या
राज्यात गणवेश वितरणात विलंब : चौकशी होणार – डॉ. पंकज भोयर
1.41 लाख विद्यार्थ्यांना मिळाले गणवेश, उर्वरित 19 हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न कायम

मुबंई : राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश वितरणात झालेल्या विलंबाची चौकशी केली जाईल आणि जबाबदारांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.
पालघर जिल्ह्यातील १,६०,९१७ विद्यार्थ्यांपैकी १,४१,२५८ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले असले तरी उर्वरित सुमारे १९ हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेले नाहीत. या मुद्द्यावर सदस्य भाई जगताप आणि प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना डॉ. भोयर बोलत होते.
ते म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये गणवेश वाटपाची पद्धत बदलण्यात आली होती. एका गणवेशाचे शिवणकाम महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडे देण्यात आले होते, तर स्काऊट-गाईडचा गणवेश शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत दिला गेला. त्यामुळे अनेक ठिकाणी वितरणात विलंब झाला.
डॉ. भोयर यांनी सांगितले की, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी सुधारित योजना राबवण्यात येत असून सर्व शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशासाठी निधी थेट ट्रान्सफर करण्यात आला आहे. या समित्या स्थानिक पातळीवर कापड खरेदी करून गणवेश तयार करत आहेत.
विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी या प्रकरणी अधिवेशन संपण्याआधी बैठक घेऊन संबंधितांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री डॉ. भोयर यांना दिले.