क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
अलिबाग बनणार धनुर्विद्येची राजधानी! १९ राज्यांतील ६५० नेमबाजांचा राष्ट्रीय स्पर्धेत अचूकतेचा महासंग्राम
22 जानेवारीपासून आरसीएफ स्पोर्ट कॉम्प्लेक्सवर जल्लोष

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग | रायगडच्या समुद्रकिनारी वसलेल्या अलिबागमध्ये यंदा केवळ पर्यटन नाही, तर राष्ट्रीय क्रीडाशक्तीचे लक्ष्यभेद पाहायला मिळणार आहे. आरसीएफ स्पोर्ट कॉम्प्लेक्स, कुरुळ येथे २२ ते २६ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय फिल्ड इनडोअर धनुर्विद्या स्पर्धा रंगणार असून, देशातील १९ राज्यांतील तब्बल ६५० नेमबाज अचूकतेची पराकाष्ठा गाठण्यासाठी सज्ज झाले आहेत.
राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया आणि फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत ७ वर्षांखालील चिमुकल्यांपासून ते अनुभवी वरिष्ठ धनुर्धारांपर्यंत महिला व पुरुष गटांमध्ये थरारक सामने रंगणार असून, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विजेत्यांचा अचूकतेचा कस लागणार आहे.
‘नाईन स्पॉट’ ठरणार हायलाइट
या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण असलेल्या ‘नाईन स्पॉट’ प्रकारात पाच गटांमध्ये नेमबाजी होणार आहे. १०, १४, १७ आणि १९ वर्षांखालील गटांसाठी २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांची पारितोषिके, तर वरिष्ठ गटासाठी थेट १ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
२३ जानेवारीला भव्य उद्घाटन
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आरसीएफ स्पोर्ट कॉम्प्लेक्स, कुरुळ, अलिबाग येथे होणार असून, आरसीएफचे कार्यपालक संचालक हिरडे, रायगड जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्यासह क्रीडा व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय स्पर्धेच्या या महासंग्रामामुळे रायगडचा क्रीडामान उंचावणार असून, अलिबाग देशाच्या क्रीडा नकाशावर ठळकपणे झळकणार आहे.




