ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

Political Tuesday’ – उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अलिबागमध्ये राजकीय हालचालींना वेग


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग  |  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी संपत असल्याने मंगळवारी अनेक इच्छुक उमेदवारांनी मुहूर्त साधत आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंगळवारचा दिवस उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर निवडला.

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी आणि पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. सुरुवातीचे दोन दिवस अर्ज भरण्याचा प्रतिसाद कमी होता. मात्र सोमवारपासून प्रक्रियेला वेग आला आणि मंगळवारी अलिबागमध्ये उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

बुधवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची कागदपत्रे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. काही उमेदवारांचे ए आणि बी फॉर्मदेखील प्राप्त झालेले नसल्याने शेवटच्या दिवशी धावपळ वाढण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र एकाच वेळी मोठ्या संख्येने उमेदवार आल्याने निवडणूक यंत्रणेवर ताण आला. अखेर पावणे तीन वाजता टोकन देऊन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे अलिबागमध्ये संध्याकाळी उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

शिवसेना शिंदे गटाकडून रसिका केणी (आंबेपूर) आणि अनंत गोंधळी (कावीर, जिल्हा परिषद मतदार संघ ), शेतकरी कामगार पक्षाकडून प्रिया ढवळे (चेंढरे, पंचायत समिती), अभिषेक पाटील ( वैजाळी, जिल्हा परिषद मतदारसंघ ), सानिका घरत (थळ, जिल्हा परिषद मतदार संघ) आणि प्रफुल्ल पाटील (खंडाळे, पंचायत समिती ) यांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. भाजपकडून प्रियदर्शनी पाटील ( चेंढरे, जिल्हा परिषद मतदार संघ ) आणि संजय पाटील (खंडाळा, पंचायत समिती मतदार संघ ), तर शिवसेना ठाकरे गटाकडून सुरेंद्र म्हात्रे (चौल, जिल्हा परिषद मतदार संघ यांनी अर्ज भरला.

काँग्रेसकडून राजाभाऊ ठाकूर (मापगाव, जिल्हा परिषद मतदार संघ ), राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीधर भोपी (कावीर, जिल्हा परिषद मतदार संघ ), अमित नाईक (वैजाळी, जिल्हा परिषद मतदार संघ) तसेच गोरेगाव मतदारसंघातून भारत गोरेगावकर यांनीही आपले अर्ज दाखल केले आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक कार्यालयात आणखी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Related Articles

Back to top button