ताज्या बातम्या
धनंजय गीध यांचे प्रसंगावधान आणि धाडस; प्रोपोलिन गॅस गळतीला रोखले

रायगड : पुणे-बेंगळुरू महामार्गावर निपाणी गावाजवळ प्रोपोलिन गॅस वाहून नेणाऱ्या टँकरमधून गळती होत असल्याची माहिती मिळताच HELP Foundation चे केमिकल एक्सपर्ट धनंजय गीध यांना तातडीने पाचारण करण्यात आले. सुमारे 350 किलोमीटर अंतर पार करत, पावसाळी रात्रीत त्यांनी प्रसंगावधान राखत आणि आपले तांत्रिक कौशल्य वापरून गळती रोखण्यात यश मिळवले.
अति ज्वलनशील गॅसची गळती हा अत्यंत धोकादायक प्रसंग होता. अशा कठीण वातावरणात लागणारी संसाधने, साहित्य घेऊन घटनास्थळी वेळेत पोहोचणे हे मोठे आव्हान होते. मात्र, आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवत आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन गीध पूर्ण तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी गळती यशस्वीरित्या रोखली.
या धाडसी मोहिमेत त्यांचे युवा सहकारी यश कुयले यांनी त्यांना मोलाची साथ दिली. स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नागरिकांनी गीध यांच्या कामगिरीचे कौतुक केले. खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी देखील त्यांचे विशेष अभिनंदन केले.
या मोहिमेमुळे HELP Foundation च्या यशस्वी कामगिरीच्या यादीत आणखी एक उल्लेखनीय कामगिरीची भर पडली आहे.