महावितरण जनमित्रास मारहाण, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
कल्याण, दि. २३ ऑक्टोबर २०२५ :
महावितरण जनमित्रास कोनगाव शाखा कार्यालयात येऊन मारहाण करणार्या चार आरोपींवर कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, कोकण प्रादेशिक कार्यालय, कल्याण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोनगाव शाखा कार्यालयात कार्यरत जनमित्र आशिष जाऊळकर हे लक्ष्मीपुजनाच्या दिवशी कर्तव्यावर हजर असताना आरोपी अजय नाईक याने त्यांना फोन करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी काय उपाययोजना केली याची विचारणा केली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन नंबर मागितला.
काही वेळातच आरोपी अजय नाईक, टोनी सिंग, प्रमोद लाड आणि संदीप सोनकांबळे हे कोनगाव शाखा कार्यालयात आले आणि जाऊळकर यांना शिवीगाळ करून रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. तेथे उपस्थित यंत्रचालक आणि सुरक्षा रक्षक यांनी मध्यस्थी केली.
जाताना आरोपींनी “पोलिस तक्रार केली तर काम करू देणार नाही” अशी धमकी दिली. अखेर आशिष जाऊळकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी वरील आरोपींविरुद्ध कलम १२१(१), ३५२, ११५(१), ३५१(१)(३) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.




