ताज्या बातम्यारायगड

AIच्या शास्त्रबळाकडून सहकारात क्रांतीची तयारी! AIचा अंगिकार, नवीन नियमांची चाहूल –

अलिबागमध्ये पतसंस्थांना नवसंजीवनी देणार प्रशिक्षण शिबिर यशस्वी


अलिबाग : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने रायगडातील सहकारी पतसंस्थांना दिशा देणारे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर अलिबाग येथे ०१ व ०२ ऑगस्ट रोजी पार पडले. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे; जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रायगड; तसेच रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जे.एस.एम. महाविद्यालयाच्या अॅड. दत्ता पाटील लॉ कॉलेज सभागृहात हे शिबिर आयोजित करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन श्री. श्रीकांत पाटील (मा. उपनिबंधक – दुग्ध, महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष अॅड. जे.टी. पाटील होते. प्रारंभिक प्रास्ताविक प्रा. एस.बी. वटाणे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन महासंघाचे सचिव श्री. योगेश रामदास मगर यांनी पार पाडले.
उद्घाटनपर भाषणात श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, “रिझर्व बँकेप्रमाणेच सहकार विभागही आता पतसंस्थांवर मार्गदर्शक तत्वे लागू करण्याच्या तयारीत असून, भविष्यात पतसंस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य होणार आहे. विशेषतः AI तंत्रज्ञानाचा अंगीकार ही काळाची गरज ठरणार आहे.”
अध्यक्षीय भाषणात अॅड. जे.टी. पाटील यांनी सरकारच्या शिक्षण निधीबाबतच्या धोरणाचा उल्लेख करत सांगितले की, “२०१३-१४ नंतर शिक्षण निधी बंधनकारक नव्हता, परंतु लवकरच कायद्यातील कलम ६८ मध्ये दुरुस्ती होऊन शिक्षण निधी सर्व सहकारी संस्थांना देणे बंधनकारक होईल.” तसेच २९ जुलै रोजी आलेल्या सहकार आयुक्त कार्यालयाच्या सुधारीत आदर्श उपविधीतील तरतुदींवरही त्यांनी भाष्य केले.
प्रशिक्षण सत्रात प्रा. अॅड. महेंद्र खरात यांनी ‘संस्था सशक्तीकरणासाठी नवकल्पना व आधुनिक व्यवस्थापन’ या विषयावर संवाद साधत सभासदांशी सन्मानाने आणि पारदर्शकतेने वागण्याचे महत्त्व अधोरेखित केले. श्री. आर.बी. यादव यांनी सहकारी कायद्यातील कलम १०१, ९१ आणि नियम १०७ मधील उपनियमांचे सुलभ भाष्य केले. तर श्री. सदानंद दीक्षित यांनी कर्ज वितरण प्रक्रियेतील सध्याची पूर्तता व भविष्यातील संभाव्य बदलांचे विश्लेषण सादर केले.
या शिबिरात रायगड जिल्ह्यातील ६० हून अधिक पतसंस्थांचे सुमारे १५० प्रतिनिधी सहभागी झाले. रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button