रमाबाई नगरमध्ये माता रमाबाईंचे स्मारक उभारणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
धम्मचक्र परिवर्तन दिनी क्लस्टर प्रकल्पाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन; 17 हजार कुटुंबांना नवे घर मिळणार

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई, ता. 13 : चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज रमाबाई नगरमध्ये आशेचा दिवा पेटला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहचारिणी माता रमाबाई यांच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या आणि पुनर्विकासाच्या भूमिपूजनाने हजारो कुटुंबांचे स्वप्न साकार होण्यास सुरुवात झाली आहे. “सागराचे पाणी आटेल, पण भिमाची आठवण कधीच आटणार नाही,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक शब्दांमध्ये माताभगिनींना आणि रहिवाशांना दिलासा दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माता रमाबाई नगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. त्यावेळी बोलताना शिंदे म्हणाले,
“मुंबईकरांना स्थगिती देणारे नव्हे तर प्रगती साधणारे सरकार हवे आहे. विकासाचे मारेकरी नव्हे, तर विकासाचे वारकरी व्हा — हेच आमचे ब्रीद आहे. हे सरकार निर्णय घेते, आणि तो निर्णय जनतेच्या कल्याणासाठीच असतो.”
शिंदे यांनी माता रमाबाई यांना वंदन करत धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. “कमिटीच्या मागणीनुसार भूमिपूजन आजच होत आहे. हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे,” असे ते म्हणाले.
यानंतर शिंदे यांनी आपल्या खास शैलीत शायरी सादर केली —
“आज का दिन है महान, खुश रहे यहां का इंसान, खत्म हो गई इंतजार की घडियां, अब मिलेगा आपके सपनों का मकान…”
आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांनी रहिवाशांच्या स्वप्नातील घराचा मुहूर्त झाल्याची जाणीव करून दिली.
“गेल्या चाळीस वर्षांपासून येथील जनता अडचणीत राहत होती. आज त्यांचा संघर्ष संपतो आहे. पुढील तीन-चार वर्षांत 17 हजार कुटुंबांचे आयुष्य उजळून निघेल. दिवाळी पुढच्या आठवड्यात असली तरी तुमच्यासाठी खरी दिवाळी आजच आहे,” असे शिंदे म्हणाले.
शिंदे यांनी सांगितले की, या क्लस्टर योजनेचा पाया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात रचला गेला; त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात प्रकल्पाला गती मिळाली. “मुख्यमंत्री म्हणून मी या योजनेला पुढे नेले आणि एमएमआरडीएला जबाबदारी दिली. कोणताही खाजगी बिल्डर नाही, म्हणून विश्वास ठेवा — दर्जेदार घरे तुम्हाला वेळेत मिळतील,” अशी हमी त्यांनी दिली.
“मी याच ठिकाणी भाड्याचे चेक वाटण्यासाठी आलो होतो. दीडशे कोटी रुपयांचे चेक दिल्यानंतर रहिवाशांचा विश्वास बसला की आपले घर खरेच होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
शिंदे पुढे म्हणाले की, “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 40 लाख मुंबईकरांना मोफत घर देण्याचे स्वप्न पाहिले होते. महायुती सरकार त्या स्वप्नाला साकार करत आहे. पुनर्विकासाचा हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर तर अजून बाकी आहे.”
ते म्हणाले, “म्हाडा, सिडको, एसआरए, बीएमसी, एमआयडीसी यांच्या माध्यमातून रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार आहोत. नोकरदार, विद्यार्थी, पोलिस, गिरणी कामगार, गोरगरीब — सर्वांसाठी परवडणाऱ्या घरांची योजना आम्ही आखली आहे.”
पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
“भिमाचे उपकार कधीच विसरता येणार नाहीत. एक जन्म काय, हजार जन्म घेतले तरी ते फेडता येणार नाहीत,” असे म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार राम कदम, पराग शहा, अधिकारी संजय मुखर्जी, महेंद्र कल्याणकर तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




