ताज्या बातम्यारायगड
खोल समुद्रात संकट: ‘तुळजाई’ बोट बुडाली, पाच जण सुखरूप किनाऱ्यावर पोचले, तीन खलाशांचा शोध सुरू

रायगड : उरण तालुक्यातील करंजा येथून मासेमारीसाठी गेलेली तुळजाई नावाची बोट खांदेरी किल्ल्याजवळ समुद्रात उलटून बुडाली. या दुर्घटनेत बोटीवरील आठ खलाशांपैकी पाच जण सुखरूप बचावले असून, तीन जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. सदरची घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
मनोहर कोळी यांची मालकी असलेली ही बोट शनिवारी सकाळी सात वाजता मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. हवामान खात्याने आधीच वादळी वाऱ्यांचा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तसेच जिल्हा प्रशासनाने मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याची सूचना दिली होती. तरीदेखील बोट समुद्रात गेली आणि लाटांच्या जोरामुळे खांदेरी किल्ल्याजवळ तिला सकाळी साडेआठच्या सुमारास अपघात होऊन ती उलटली.
बोट बुडणार असल्याचे लक्षात येताच आठही खलाशांनी समुद्रात उड्या घेतल्या. यामध्ये संदीप कोळी (वय 38, करंजा), हेमंत गावंड (वय 45, उरण), रोशन कोळी (वय 39, करंजा), कृष्णा भोईर (वय 55, आपटा-पनवेल) आणि शंकर भोईर (वय 64, आपटा -पनवेल) हे पाच खलाशी पोहत किनाऱ्यावर पोहोचण्यात यशस्वी झाले. सर्वजण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यापैकी रोशन कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, बेपत्ता असलेल्या नरेश राम शेलार, धीरज कोळी, रा. कासवला पाडा, उरण, मुकेश यशवंत पाटील या तिघांचा शोध सुरू असून कोस्टगार्ड व प्रशासन या दिशेने प्रयत्न करत आहेत.