दुखापतीनंतर पंत संघात परतला; फलंदाजी करणार, कीपिंग जुरेलकडे

इंग्लंड : भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज ऋषभ पंतविषयी एक मोठा अपडेट समोर आला आहे. मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी खेळादरम्यान त्याला दुखापत झाली होती. या घटनेत त्याच्या पायाचे बोट फ्रॅक्चर झाले. त्यामुळे तो उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही, अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती.
मात्र आता बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे की पंत मँचेस्टर स्टेडियममध्ये दाखल झाला असून संघात पुन्हा सामील झाला आहे. विशेष म्हणजे, संघाची गरज भासल्यास तो फलंदाजी करण्यास तयार आहे. याचा अर्थ असा की पंत फलंदाज म्हणून मैदानात उतरेल, परंतु विकेटकीपिंगची जबाबदारी ध्रुव जुरेलकडेच असणार आहे. पंत संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, तो फलंदाजीसाठी उपलब्ध असल्याने टीम इंडियासाठी ही एक सकारात्मक बातमी ठरते.
कशी झाली पंतला दुखापत?
पहिल्या डावात ऋषभ पंत 37 धावांवर खेळत असताना त्याने रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस वोक्स याच्या चेंडूवर बॉल थेट त्याच्या उजव्या पायावर लागला. ही घटना भारतीय डावाच्या 68व्या षटकात घडली. चेंडू लागल्यानंतर पंत वेदनांनी विव्हळताना दिसला. चालण्यास अक्षम झाल्यामुळे त्याला स्टे्रचरवरून बाहेर नेण्यात आले आणि तातडीने रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्याच्या पायातून रक्तही वाहताना दिसले.
दुसऱ्यांदा झाली दुखापत
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या मालिकेत पंतला दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे. यापूर्वी लॉर्ड्स येथे खेळलेल्या तिसऱ्या कसोटीतही विकेटकीपिंग करताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे इंग्लंडच्या दुसऱ्या डावात तो कीपिंगसाठी मैदानात उतरू शकला नव्हता. त्यावेळीसुद्धा ध्रुव जुरेलने त्याच्या जागी विकेटकीपिंग केली होती. सध्याच्या सामन्यातही हीच जबाबदारी जुरेलकडेच असेल.