शब्द नव्हे, कृतीतून देशभक्ती – ॲड. प्रविण ठाकूर यांची सैनिक कल्याण निधीस एक लाखांची मदत

अलिबाग : जिल्ह्यातील नामांकित विधिज्ञ आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲड. प्रविण मधुकर ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत एक लाख रुपयांची भरघोस मदत सैनिक कल्याण निधीस केली. त्यांच्या या सामाजिक योगदानाचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
गेल्या १९ वर्षांपासून वाढदिवस हा उत्सव न मानता त्यांनी तो सेवा आणि कृतज्ञतेचा दिवस म्हणून पाळला आहे. याच परंपरेनुसार, सोमवार, २१ जुलै रोजी, ॲड. ठाकूर यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सब लेफ्टनंट (निवृत्त) विजय पाटील यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.
या वेळी बोलताना ॲड. ठाकूर म्हणाले, “देशाच्या सीमांवर डोळ्यांत तेल घालून पहारा देणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं ऋण फेडणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे.”
सब लेफ्टनंट (निवृत्त) विजय पाटील यांनी आभार व्यक्त करताना सांगितले, “अशा मदतीमुळे शहीद व सेवापर सैनिकांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळतो. समाजातील इतरांनीही या कृतीतून प्रेरणा घ्यावी.”
या उपक्रमाला शहरातील अनेक संघटना, मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचे अभिनंदन केले आहे. या मदतीमुळे सैनिक कल्याण निधीला आर्थिक बळ मिळणार असून इतर नागरिकांमध्येही समाजसेवेसंबंधी जागरूकता वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या वेळी अपूर्वा ठाकूर, धनश्री ठाकूर, कुबेर ठाकूर, आर. डी. पाटील, सुभेदार अभिजित शिंदे, नायक बळीराम म्हात्रे, तबिश खान व संजय सावंत उपस्थित होते.