सप्टेंबरमध्ये नवा इतिहास! नवी मुंबई विमानतळ सज्ज — जगातली सर्वात फास्ट बॅग क्लेम सिस्टीम भारतात
दशलक्ष प्रवासी क्षमतेसह आधुनिक सुविधा; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

रायगड –बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सप्टेंबर 2025 मध्ये प्रवाशांसाठी खुले होणार असून, याच महिन्यात पहिलं प्रवासी विमान टेक ऑफ होणार आहे. या विमानतळावर जगातील सर्वात जलद बॅग क्लेम सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांनी विमानतळ प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. आतापर्यंत ९६.५% काम पूर्ण झालं असून, उर्वरित कामांसाठी अधिक कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात २० दशलक्ष प्रवासी आणि ०.८ दशलक्ष टन मालवाहतुकीची क्षमता असणार आहे.
या प्रकल्पात १,१६० हेक्टर जमिनीवर काम सुरू असून, नदी वळवणे, विद्युत वाहिन्यांचे स्थानांतरण यासह अनेक विकासपूर्व कामे पूर्ण झाली आहेत. SU-30 आणि इंडिगोच्या A320 विमानांनी आधीच यशस्वी लँडिंग करून चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
प्रकल्पासाठी एकूण १९,६४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यातील मोठा हिस्सा एसबीआय आणि सिडको द्वारे निधी दिला जात आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच होणार आहे, अशीही घोषणा करण्यात आली.
—