ताज्या बातम्या
निधीशिवाय आदेश म्हणजे कचरा – शरद पवारांचा सरकारवर घणाघात!

मुंबई : आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन चांगलंच तापलं असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रत्यक्ष भेट देत सरकारला निधीच्या असंवेदनशीलतेवर सुनावलं. “निधीशिवाय दिलेला आदेश कचऱ्याइतकाच व्यर्थ” अशी जहाल टीका करत त्यांनी सरकारला एका दिवसात तोडगा काढण्याची मागणी केली.
शरद पवार म्हणाले, “शिक्षकांच्या मागण्या न्याय्य असून, त्यांना चिखलात बसून आंदोलन करावं लागणं ही शरमेची बाब आहे. निधीची तरतूद न केलेला आदेश हा कचरा टाकल्यासारखाच आहे.” त्यांनी सरकारला जाब विचारत सांगितलं की, “गेल्या 56 वर्षांत मी विधिमंडळाच्या विविध सभागृहांत काम केलं आहे. निधी कसा मिळवायचा हे मला माहीत आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे.”
पवार यांनी शिक्षकांच्या हक्कासाठी खांद्याला खांदा लावून लढण्याचं आश्वासन दिलं. तसेच एका दिवसात शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणीही सरकारकडे केली.
राज्यात सुमारे 5,000 खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 च्या अधिवेशनात जाहीर झाला होता. मात्र, 10 महिने उलटल्यानंतरही प्रत्यक्ष निधीची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे संतप्त शिक्षकांनी 8 आणि 9 जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात सध्या 5,844 अंशतः अनुदानित शाळा असून त्यात एकूण 44,000 पेक्षा अधिक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. सरकारकडून निधी मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही शिक्षक समन्वय संघाकडून देण्यात आला आहे.