ताज्या बातम्या
समुद्रातून डिझेल तस्करीचा गोरखधंदा उघडकीस — रायगड पोलीसांची मोठी कारवाई, मासेमारी बोटीतून 14 लाखांचा साठा जप्त

रायगड : जिल्ह्याच्या किनारपट्टीवर डिझेलच्या बेकायदेशीर तस्करीचा पर्दाफाश करत मांडवा सागरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘श्री समर्थ कृपा’ नावाच्या मच्छीमारी बोटीमधून जवळपास ५ हजार लिटर डिझेल जप्त करण्यात आले असून मुख्य सूत्रधार गणेश कोळीला अटक करण्यात आली आहे. इतर सहआरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून तपास अधिक गतीने सुरू आहे.
रायगड जिल्ह्याच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्यावरून डिझेलच्या बेकायदेशीर तस्करीची माहिती पोलिस अधीक्षक सौ. अंचल दलाल यांना गुप्त खबऱ्यांमार्फत मिळाली. यानंतर पोलिस अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलिसांनी रेवस पिटी किनाऱ्यावर पाळत ठेवत सापळा रचला.
४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ‘श्री समर्थ कृपा’ नावाची मासेमारी बोट (IND MH3 MM5464) संशयास्पद स्थितीत आढळून आली. पोलिसांनी बोटीत छापा टाकत तपासणी केली असता ५ हजार लिटर डिझेलचा साठा सापडला. सुमारे १४.३० लाख रुपयांचा हा साठा पोलिसांनी जप्त केला असून मांडवा सागरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश कोळी, रा. बोर्डी, यास अटक करून पोलिस कोठडीत रिमांड घेण्यात आला आहे. इतर आरोपींची नावेही समोर आली असून त्यामध्ये जिनाई कोळी, मोरेश्वर नाखवा, जिरेन (उत्तर प्रदेश), मुशीर जर्नाद, लक्ष्मण (मुंबई) आणि सागर प्राईड बोटीवरील खलाशी यांचा समावेश आहे. सर्व आरोपींच्या अटकेसाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.
पोलिसांच्या तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, ही टोळी FIND SHIP या अॅपच्या माध्यमातून समुद्रातील मोठ्या व्यापारी जहाजांशी संपर्क साधून रोख रकमेच्या मोबदल्यात बिनपुराव्याने डिझेल खरेदी करत असे. काहीवेळा मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर वस्तू देखील त्यांना मोबदल्यात देण्यात येत असत.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक सौ. अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अजित जाठे, पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे, सपोनि जितेंद्र भोई, पोसई सुजाता खोत आणि मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.