ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

कामार्ली धरणाचे सहा दरवाजे उघडले, मात्र जबाबदारीचे दरवाजे अद्यापही बंद,

प्रशासनाने सतर्कतेचा  इशारा देऊन जबाबदारी झटकली?


फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई 
रायगड : पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्पातील कामार्ली धरणाची पातळी 85.10 मीटरवर पोहोचताच आज सकाळी 11.28 वाजता सहा दरवाजे उघडावे लागले. धरणातून तब्बल 119.54 घनमीटर/सेकंद विसर्ग सुरू असून, भोगेश्वरी नदीकाठच्या गावांना ‘सतर्कतेचा इशारा’ दिला गेला आहे. पाऊस आज रात्री असाच सुरू राहिल्यास गंभीर पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. धरणातून विसर्ग होतोय, पण जबाबदारीचे दरवाजे मात्र अजूनही घट्ट बंद का आहेत? हा खरा प्रश्न आहे.
दरवर्षी धरण भरल्यानंतरच दरवाजे उघडून गावकऱ्यांच्या जीविताचा व शेतीचा खेळ का केला जातो? आधीपासून पाणी नियोजन का नाही?
धरणाची सद्यस्थिती
एकूण प्रकल्पीय साठा : 147.49 दलघमी
उपयुक्त साठा : 144.98 दलघमी
सध्याचा साठा : 141.587 दलघमी (96%)
आजचा पाऊस : 69 मिमी
आतापर्यंतचा एकूण पाऊस : 2345 मिमी
…….
फडशा एक्सप्लेनर
धरण विसर्ग – नियम आहेत, पण जबाबदारी का नाही ?
दरवर्षी पावसाळ्यात धरणं भरतात, दरवाजे उघडले जातात आणि नदीकाठच्या गावांवर पूरस्थिती ओढवते. प्रशासन नेहमी सांगतं – “नियमाप्रमाणे दरवाजे उघडले”. मग प्रश्न असा – जर नियम आहेत तर लोकांचे जीव-मालमत्ता धोक्यात का येतात? आणि जबाबदार ठरतं कोण?
१. नियम वक्र (Rule Curve) म्हणजे काय?
प्रत्येक धरणासाठी वैज्ञानिक पद्धतीने एक Rule Curve आखलेला असतो.
यात पावसाळ्यातील प्रत्येक महिन्यानुसार पाणीसाठ्याची टक्केवारी किती असावी हे ठरवलेले असते.
उदाहरणार्थ : जुलैमध्ये साठा जास्त ठेवायचा की कमी, ऑगस्टमध्ये किती टक्के झाला की विसर्ग सुरू करायचा, हे स्पष्ट केलेलं असतं.
२. प्रत्यक्षात काय होतं?
प्रशासन अनेकदा Rule Curve पाळत नाही, असा आरोप आपण नेहमी ऐकत आलो आहोत.
पाणी साठा ९५-१००% झाला कीच अचानक दरवाजे उघडले जातात.
परिणाम – गावकरी आणि शेतकरी बेपर्वाईचा बळी ठरतात.
३. जबाबदारी कशी टाळली जाते ?
“सतर्कतेचा इशारा दिला” एवढ्यावर प्रशासन आपली जबाबदारी संपवते.
निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे, फाईल्स, कागदपत्रं जनतेपासून लपवली जातात.
लोकप्रतिनिधी फक्त श्रेय लाटण्यात व्यस्त – पण नुकसान झाल्यास जबाबदार कोण हे कुणी विचारत नाही.
फडशाचे सवाल
👉 जर नियम वक्र पाळले जात असतील तर पूरस्थिती का निर्माण होते?
👉 धरण व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करणारी यंत्रणा का नाही?
👉 विसर्गामुळे नुकसान झाल्यास चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही?
👉 लोकप्रतिनिधी जनता वाचवण्यासाठी आहेत की फक्त फोटो काढण्यासाठी?
फडशा लक्ष वेधू इच्छितो
💬 “धरण व्यवस्थापन ही विज्ञानावर आधारित प्रक्रिया आहे. हवामान अंदाज, पावसाचं प्रमाण, नदीकाठची क्षमता – यांचा हिशोब करून वेळेवर विसर्ग व्हायला हवा. पण प्रत्यक्षात होतं काय? नियम वक्राचे पालन नाही, पारदर्शकता नाही, जबाबदारी नाही. गावकऱ्यांचा जीव नशिबावर सोपवणं थांबवून प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जबाबदार धरण्याची वेळ आली आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button