ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
रायगडमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; काही नद्या धोक्याच्या पातळीवर, रेड अलर्ट जारी

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील काही प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत धोकादायक वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे.
आज सकाळी ११ वाजेपर्यंतच्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, अंबा नदी (नागोठणे बंधारा) व कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) या नद्यांची पाणीपातळी इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या जवळ पोहोचली आहे. अंबा नदीची सध्याची पातळी ८.१५ मीटर असून इशारा पातळी ८ मीटर आहे. तर कुंडलिका नदीची पातळी २३.८० मीटर असून इशारा पातळी २३ मीटर आहे.
दरम्यान, सावित्री नदी, पाताळगंगा नदी, उल्हास नदी (दहेगाव बंधारा) आणि गाढी नदी (शास्त्री ब्रिज, पनवेल) या नद्यांची पाणीपातळी सध्या इशारा पातळीपेक्षा कमी आहे. मात्र सततच्या पावसामुळे त्यात वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हायअलर्टवर असून नद्यांच्या काठावरील तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक तेव्हा सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.