कुसुंबळे ग्रामपंचायततीचा मोठा निर्णय : जे.एस.डब्ल्यूच्या प्रकल्पाला ९३५ ग्रामस्थांची एकमुखी संमती
ग्रामसभेत ठराव पारित, विकासाच्या दिशेने ग्रामस्थ्यांचे पाऊल

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : स्वातंत्र्य दिनी कुसुंबळे ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. आज (१५ ऑगस्ट २०२५) सकाळी १० वाजता झालेल्या विशेष ग्रामसभेत जे.एस.डब्ल्यूच्या विस्तारित तिसऱ्या प्रकल्पाला तब्बल ९३५ ग्रामस्थांनी हात वर करून एकमुखी संमती दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी होते.
ग्रामसभेत प्रकल्पामुळे होणाऱ्या स्थानिक फायद्यांवर – विकासकामे, रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधा उभारणी – यावर सविस्तर चर्चा झाली. ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, हा प्रकल्प गावाला नवे भविष्य देईल आणि सर्वांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल.
ग्रामविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह ठराव अधिकृतरीत्या नोंदवून लवकरच शासन व संबंधित यंत्रणांकडे पाठविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने या प्रकल्पाला अधिकृत पाठिंबा जाहीर केला होता. “प्रकल्पामुळे गावातील तरुणांचा उत्कर्ष होणार असून बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळेच ग्रामसभेत एकमुखी पाठिंबा मिळाला,” असे ग्रामसभेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी सांगितले.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभा या विशेष मानल्या जातात. अशाच या स्वातंत्र्य दिनाच्या विशेष ग्रामसभेत हा महत्त्वाचा ठराव संमतीसह पारित झाला.