
खोपोली | क्रीडा प्रतिनिधी
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)च्यावतीने आयोजित दुसऱ्या सत्राच्या पंच शिबिरास खोपोली येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी, २ ऑगस्ट रोजी आरडीसीएचे उपाध्यक्ष यशवंत साबळे यांच्या ‘महाराजा बँक्वेट हॉल’मध्ये हे शिबिर पार पडले.
या शिबिरात माजी रणजीपटू व बीसीसीआयचे मान्यताप्राप्त पंच हर्षद रावले, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच राजन कसबे आणि क्रिकेट नियमतज्ज्ञ नयन कट्टा यांनी उपस्थित पंचांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सुमारे ५० प्रशिक्षार्थी पंचांनी या कार्यशाळेत भाग घेतला. हे प्रशिक्षण शिबिर १०० दिवस चालणार असून, प्रत्यक्ष कार्यशाळा आणि ऑनलाइन माध्यमातून वर्ग घेतले जात आहेत. रायगड पंच पॅनलची लेखी परीक्षा २३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
शिबिरात एमसीसी क्रिकेट लॉ, तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एकदिवसीय, टी-२० आणि मल्टी डेज प्रकारांमधील नवीन नियमांचे प्रात्यक्षिक काशी क्रिकेट अकॅडमीच्या टर्फवर घेण्यात आले.
आरडीसीएचे उपाध्यक्ष यशवंत साबळे आणि सदस्य कौस्तुभ जोशी यांनी मागील वर्षी मुला-मुलींच्या सर्व वयोगटांतील ३२५ हून अधिक सामन्यांचे यशस्वी आयोजन केल्याची माहिती दिली. यावर्षी किमान ५०० सामन्यांचे नियोजन असून, त्यात सर्व वयोगटातील आणि खुल्या गटातील क्रिकेट सामने समाविष्ट असतील.
त्याचप्रमाणे, १६ वर्षाखालील मुलांच्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील १५ दोनदिवसीय सामन्यांचे यशस्वी आयोजनही रायगडमध्ये करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सर्व सामन्यांमध्ये स्थानिक प्रशिक्षित पंचांनी आपले योगदान दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी यशवंत साबळे, कौस्तुभ जोशी, ॲड. पंकज पंडित, शंकर दळवी, विनोद सोळंकी, तसेच प्रशिक्षक म्हणून हर्षद रावले, राजन कसबे आणि नयन कट्टा उपस्थित होते.
शिबिरासाठी महाराजा बँक्वेट हॉल विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आरडीसीएने यशवंत साबळे यांचे आभार मानले.
रायगड जिल्ह्यात अधिकाधिक प्रशिक्षित पंच घडविण्यासाठी आरडीसीए सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील आणि सचिव प्रदीप नाईक यांनी स्पष्ट केले.