ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

२२ कोटींचं टेंडर मात्र रस्ता ४३% कमी खर्चात – खड्डे भरणार की भ्रष्टाचाराने खिसे भरणार?

रस्ते संघर्ष समितीचा सवाल : आम्ही कर १००% भरतो, मग रस्ता ५७% क्वालिटीचा का?


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
रायगड : वडखळ-अलिबाग महामार्गासाठी २२ कोटी रुपयांचं टेंडर मंजूर झालंय. पण तेही तब्बल ४३.८० टक्के कमी खर्चात! म्हणजे सरकारने १०० रुपयांचं काम मंजूर केलं, आणि ठेकेदाराने “मी ५७ रुपयांत करू” म्हणत बोली मारली. आता प्रश्न उभा राहतो – उरलेले ४३ रुपये कुठे गायब होतात? खड्डे बुजवले जातील की भ्रष्टाचाराच्या खड्ड्यातच हा पैसा गाडला जाईल?
नागरिकांचा संताप
अलिबाग तालुका रस्ते संघर्ष समितीने पेण येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात धडक दिली आणि सरळ सवाल केला – “आम्ही टोल, कर, दंड सगळं १०० टक्के भरतो, मग आमच्यासाठी रस्ता फक्त ५७ टक्के क्वालिटीचा का?”
मुंबई-पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांचा जीव रोज धोक्यात, गाड्यांचे पार्ट तुटलेले, इंधनाचा अतिरिक्त खर्च – या सर्वाचं नुकसान कोण भरून काढणार?
खड्ड्यांची राजधानी – वडखळ-अलिबाग महामार्ग
पिंपळभाट, राऊतवाडी-वाडगांव फाटा, खंडाळा-तळवली, वडेवाले-चरी फाटा, पेझारी-पोयनाड-पांडबादेवी… कुठेही बघा, रस्त्याऐवजी खड्ड्यांचाच महामार्ग! संघर्ष समितीचं विधान थेट – “हा मार्ग गुरं-ढोरांसाठी योग्य, माणसांसाठी नव्हे.”
कंत्राटदार-प्रशासनाच्या संगनमताचा संशय
२२ कोटींचं काम ४३% कमी दरात मिळालं म्हणजे सरळ संशय – किंवा दर्जा घसरेल, किंवा निम्मं डांबर कागदावरच पसरलं जाईल! एवढ्या कमी पैशात मजबूत रस्ता होणं शक्यच नाही, मग उरलेले पैसे कोणाच्या खिशात जाणार? प्रशासन आणि कंत्राटदारांच्या संगनमताने भ्रष्टाचाराचा डांबरी रस्ता तयार होत नाही ना, हाच खरा प्रश्न आहे.
रस्ते संघर्ष समितीचा इशारा 
महामार्ग विभागाने लेखी दिलेलं आश्वासन – १० सप्टेंबरपासून खड्डे भरण्याचं काम सुरू होईल. पण जनता आता गाफील नाही. संघर्ष समितीचा इशारा सरळ – “काम दर्जेदार नसेल, वेळेत नसेल, तर थेट रस्ता रोको करून भ्रष्टाचाराचा फडशा पाडला जाईल.”
आजच्या आंदोलनात माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ऍड.मानसी म्हात्रे ,ऍड.प्रवीण ठाकूर निलेश पाटील, दिलीप जोग ,सुरेश घरत, शैलेश  चव्हाण,सचिन राऊळ,आकाश राणे,निखिल मयेकर,विक्रांत वार्ड ,  विकास पिंपळे,ऍड.रत्नाकर पाटील,आमोद मुंडे,प्रमोद घासे, चेतन कवळे,योगेश पाटील,राजू विश्वकर्मा, संदीप गायकवाड,व इतर नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button