१७ वर्षांनंतर भारताचा जागतिक बॅडमिंटन इतिहास उजळवणारी तन्वी शर्मा — जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाची कमाई

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : भारताची १६ वर्षीय प्रतिभावान बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा हिने जागतिक ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अप्रतिम खेळ सादर करत १७ वर्षांनंतर भारतासाठी पदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत सुवर्णपदकाची स्वप्ने थोडक्यात हुकली असली, तरी तन्वीने आपल्या दमदार कामगिरीने भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात नवे पान लिहिले.
थायलंडच्या दुसऱ्या मानांकित खेळाडू अन्यपत फिचितप्रिचासक हिने तन्वीचा १५-७, १५-१२ असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. तरीही तन्वीने संपूर्ण स्पर्धेत दाखवलेल्या आत्मविश्वासपूर्ण खेळाने सर्वांचे लक्ष वेधले आणि भारतासाठी रौप्यपदक जिंकणारी तिसरी खेळाडू ठरली.
याआधी केवळ सायना नेहवाल (२००८ मध्ये सुवर्ण, २००६ मध्ये रौप्य) आणि अपर्णा पोपट (१९९६ मध्ये रौप्य) या दोन खेळाडूंनीच या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत पदके जिंकली होती.
अंतिम सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या गेममध्ये तन्वीने काही अप्रतिम स्ट्रोक्स खेळले, मात्र निर्णायक क्षणी थाई खेळाडूने सातत्य राखत आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये तन्वीने सुरुवातीला ६-१ अशी आघाडी घेतली होती, परंतु अनुभवाच्या बळावर फिचितप्रिचासकने पुनरागमन करत सामना आपल्या बाजूला खेचला.
या पराभवातूनही तन्वी शर्माने भारतीय क्रीडा जगताला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. तिच्या या ऐतिहासिक यशाने देशातील नव्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणेचा नवा किरण मिळाला आहे.




