ताज्या बातम्यामहाराष्ट्र
“‘हे अन्न नव्हे तर विष’ – संजय गायकवाड यांचा संताप, कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण?”

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील आकाशवाणी कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट जेवणावर संताप व्यक्त करत मोठा वाद निर्माण केला आहे. काल रात्री उशिरा मिळालेल्या अन्नामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचा दावा त्यांनी केला. इतकंच नव्हे तर रागाच्या भरात त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोपही केला जात आहे.
गायकवाड म्हणाले, “मी साडे पाच वर्षांपासून मुंबईत येतोय. सहसा बाहेर जेवत नाही. काल रात्री 9.30 वाजता वरण, भात, डाळ आणि चपातीची ऑर्डर दिली. पहिला घास घेतल्यानंतरच जेवण अतिशय घाणेरडं वाटलं. दुसरा घास घेतल्यावर मला उलटी झाली. डाळेला प्रचंड वास येत होता आणि भात शिळा होता.”
ते पुढे म्हणाले, “हे प्रवासामुळे नव्हे, तर जेवणामुळे होतंय. हा प्रकार फक्त आमदारांच्याच नाही, तर सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी यांच्याही जीवाशी खेळ करणारा आहे. कोणाच्या जेवणात सुतळी, तर कोणाच्या डिशमध्ये पाल सापडते. हा मग्रुरीचा प्रकार आहे.”
गायकवाड यांनी गंभीर इशारा देत सांगितलं की, “जर वारंवार सांगूनही यावर कारवाई होत नसेल, समजावलं जात नसेल, तर आम्हालाही आमच्या भाषेत उत्तर द्यावं लागेल. 10 दिवसांपूर्वीचा शिळा भात आणि वरण देणं म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे. यावर आम्ही गय करणार नाही.”