ताज्या बातम्यादेश विदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड

‘हुडीतील सावली’ जुहूच्या रात्रीत धावली! बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर थरारक गोळीबार


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

मुंबई |  

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री उशिरा घडली असून त्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एक तरुण दुचाकीवरून बंगल्याबाहेर आला होता. त्याने ओळख लपवण्यासाठी ‘हुडी’ घातली होती आणि काही क्षणांतच आपल्या जवळील बंदुकीतून बंगल्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या. या गोळीबारात बंगल्याच्या खिडकीच्या काचांचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून वेगाने फरार झाला. सुदैवाने, या घटनेत रोहित शेट्टी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे, तसेच नागरिक व प्रत्यक्षदर्शींची सखोल चौकशी सुरू आहे. हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला की यामागे कोणत्यातरी टोळीचा किंवा गँगस्टरचा हात आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, बंगल्याबाहेर तैनात असलेल्या पोलिसांचा ताफा आणि तणावपूर्ण वातावरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, या घटनेमुळे पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून तपास वेगाने सुरू आहे.

Related Articles

Back to top button