ताज्या बातम्या
हिरकणी एसटी बसच्या निष्काळजीपणामुळे वृद्धाचा मृत्यू; चालक पळाल्याने संतापाची लाट

रायगड, रोहा – सार्वजनिक वाहतूक सेवेचा आधार मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रोहा बस स्थानकात शुक्रवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे अपघातानंतर संबंधित “हिरकणी” बसचा चालक घटनास्थळावरून पसार झाला, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मृत व्यक्तीचे नाव मनोहर नाखरेकर (वय ६५, रा. धनगर आळी, रोहा) असे असून ते बाजारातून खरेदी करून परतत असताना ही दुर्घटना घडली. सातारा-वाई-महाबळेश्वर-महाड मार्गे रोहा येथे येणारी हिरकणी बस (क्रमांक MH-14 KQ-3970) अत्यंत भरधाव व निष्काळजीपणे चालवली जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बसने नाखरेकर यांना जोरदार धडक दिली आणि धडकेनंतर बसचे पुढील चाक त्यांच्या पोटावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर बसचा चालक कोणतीही जबाबदारी न घेता बस सोडून फरार झाल्याची बाब विशेष चिंतेची ठरत आहे. घटनास्थळी तत्काळ पोलीस दाखल झाले आणि नाखरेकर यांना उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे हलवण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
ही घटना घडत असतानाच, काही महिन्यांपूर्वी अलिबाग व मुरुड परिसरातही एसटी बसच्या धडकेत नागरिकांचे प्राण गेले होते. अशा घटना वारंवार घडत असूनही एसटी महामंडळाच्या प्रशासनाने बस चालकांच्या प्रशिक्षण, वेगावर नियंत्रण आणि जबाबदारी याकडे पुरेसे लक्ष न दिल्याचे स्पष्ट दिसत आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या हलगर्जी कारभाराचा निषेध करत दोषी चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, बस स्थानक व परिसरात वाहतुकीसाठी अधिक शिस्तबद्ध यंत्रणा निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून एसटी प्रशासनाने तातडीने सुधारणा न केल्यास भविष्यात आणखी गंभीर अपघात घडू शकतात, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.