ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

हातभट्टी दारूचा धंदा महागात पडला! रोह्यातील ४ जण चार तालुक्यातून वर्षभरासाठी तडीपार


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग |

रोहा तालुक्यात अवैध गावठी दारू तयार करून विक्री करणाऱ्या चार सराईत इसमांवर रायगड पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. संबंधितांना चार तालुक्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) रायगड-अलिबाग यांच्या अहवालावरून पोलिस अधीक्षकांनी हा आदेश जारी केला आहे.
रोहा पोलिस ठाणे हद्दीतील मौजे बेलवाडी, पो. तांबडी, ता. रोहा येथील संबंधित इसम सन २०१४ ते २०२५ या कालावधीत सातत्याने अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करण्याचा बेकायदेशीर व्यवसाय करत होते. पोलिसांनी वेळोवेळी गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न केला, मात्र नियमित कारवाई करूनही त्यांनी हा अवैध धंदा सुरूच ठेवला होता.
या प्रकारामुळे रोहा तालुका व परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कुटुंब व्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने कारवाई करण्यात आली.
त्यानुसार दिनेश कोडू शिंदे (वय ३८), वसंत बाळू हिरवे (वय ३५), मंगेश बाळाराम गोरे (वय ३०) आणि जयंता राघो गोरे (वय ३२) सर्व रा. बेलवाडी, पो. तांबडी, ता. रोहा, जि. रायगड या चारही इसमांना रोहा, तळा, अलिबाग व मुरुड तालुक्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक, रायगड-अलिबाग यांनी दिले आहेत.
रायगड जिल्ह्यात अवैध दारू, शस्त्र बाळगणे, गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच अशा बेकायदेशीर व्यवसायात सहभागी असलेल्या इसमांवर गुन्हे दाखल होऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसेल तर तडीपारची कारवाई करण्यात येणार असून अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
….


Related Articles

Back to top button