क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

हँडबॉलच्या विकासासाठी नवे पर्व : महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी मंत्री अतुल सावे यांची बिनविरोध निवड


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
नाशिक :  महाराष्ट्रातील हँडबॉल खेळाच्या विकासाला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे राज्यातील हँडबॉल खेळाला सक्षम, दूरदृष्टीपूर्ण व प्रभावी नेतृत्व लाभल्याची भावना क्रीडाविश्वातून व्यक्त होत आहे.

हँडबॉल स्पोर्ट्स असोसिएशन रायगड यांच्यावतीने नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल सावे आणि नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.

ही निवडणूक हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली नाशिक येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे पार पडली. या निवडणुकीत निवृत्त न्यायमूर्ती भगवंतराव गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, तर हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. प्रीतपाल सिंग सलुजा हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
नवी कार्यकारिणी जाहीर
या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्षपदाची जबाबदारी अतुल सावे यांच्याकडे देण्यात आली असून, विजय सोनवणे (जळगाव) यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. उपाध्यक्ष म्हणून हनुमंत लुंगे (अमरावती), उदय पवार (धुळे), जर्नाधन गुपिले (नांदेड) व रविदास शिरोडकर (सिंधुदुर्ग) यांची निवड करण्यात आली.
महासचिवपदी रणधीर सिंग (मुंबई), कोषाध्यक्षपदी शिवछत्रपती पुरस्कार विजेते सतीश धोंडगे (नाशिक) तर सहसचिव म्हणून पंकज भारसाखळे (छ. संभाजीनगर), आनंद चव्हाण (सोलापूर), मिलिंद शिंदे (ठाणे) व अभिजित वनिरे (कोल्हापूर) यांची निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींना संधी देण्यात आली आहे.
ग्रामीण व गुणवंत खेळाडूंना प्राधान्य
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना अतुल सावे यांनी सांगितले की, राज्यात नियमितपणे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण व निमशहरी भागातील खेळाडूंकरिता संरचित हँडबॉल लीग स्पर्धा सुरू केल्या जातील.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षण, क्रीडा साहित्य आणि आर्थिक सहाय्य देण्याचा संघटनेचा ठाम संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या महाराष्ट्रातील ३० हून अधिक जिल्ह्यांत हँडबॉलची संघटनात्मक रचना कार्यरत असून, आगामी काळात शालेय व महाविद्यालयीन स्तरावर प्रशिक्षक व पंच प्रशिक्षण, तसेच टॅलेंट सर्च उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या निवडीमुळे महाराष्ट्रातील हँडबॉल खेळाला नवे बळ मिळणार असून, राज्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी ही कार्यकारिणी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.


Related Articles

Back to top button