ताज्या बातम्यामुंबईरायगड
स्वराज्य स्मरणातून ‘प्रतापगड पर्व’ : शिवजयंतीनिमित्त ऐतिहासिक कार्यक्रम
१९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावन दिवशी ऐतिहासिक स्मृतींना उजाळा, अलिबागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायं. ७:४५ वाजता ‘प्रतापगड पर्व’ शिवचरित्रातील पराक्रम, स्वराज्यविचार आणि प्रेरणादायी प्रसंगांचे सादरीकरण, शिवभक्तांनी उपस्थित राहून स्वराज्याचा वारसा जपण्याचे आवाहन

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ — म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० हा दिवस भारतीय इतिहासात स्वातंत्र्याच्या पहाटेचा आरंभ मानला जातो. अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्तांच्या दडपशाहीत अडकलेल्या जनतेला स्वराज्याचा ध्यास देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मदिन. जिजामाता यांच्या संस्कारांतून घडलेले हे व्यक्तिमत्त्व पुढे हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार ठरले.

या ऐतिहासिक स्मृतींचा जागर करत १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘प्रतापगड पर्व’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गाज फाउंडेशन, मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि मावळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.

शिवचरित्रातील पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभार यांचे दर्शन घडवणारे निवडक प्रसंग या कार्यक्रमातून सादर केले जाणार आहेत. अफझलखानवध, गनिमी कावा, किल्ल्यांची उभारणी, स्वराज्यसंस्थेची निर्मिती अशा ऐतिहासिक घटनांची आठवण करून देत तरुण पिढीमध्ये स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागवण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.

इतिहासाच्या पाऊलखुणा जपत शिवविचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन गाज फाउंडेशनचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे सरखेल व मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्ट, अलिबागच्या अध्यक्षा ऍड. मानसी संतोष म्हात्रे यांनी नागरिकांना केले आहे.
…..




