क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“स्वप्नांच्या मैदानावर, रायगडचा संघ बनतोय!” रणसंग्राम — राज्यातील क्रिकेटचा भविष्यातील पाया इथूनच


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग : रायगडच्या मैदानांवर सध्या फक्त क्रिकेट सामने नाही, तर स्वप्नांचा रणसंग्राम सुरू आहे. महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवण्याचे ध्येय घेऊन १९ वर्षांखालील रायगडमधील शेकडो तरुण क्रिकेटपटू मैदानात उतरत आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित एकदिवसीय (४० षटकांच्या) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली असून, या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील तरुणाईच्या क्रिकेट कारकिर्दीला नवे वळण मिळणार आहे.
खारघर येथील घरत क्रिकेट मैदानावर असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश पाटील यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनीय सामन्यात एसबीसी महाड आणि चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर यांच्यात रंगतदार लढत झाली. या स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्ह्यातील विविध मैदानांवर करण्यात आले असून त्यात बी.पी. पाटील क्रिकेट मैदान (खारघर), फोर्टी प्लस गावदेवी मैदान (टेंभोटे, पनवेल), छत्रपती शिवाजी महाराज मैदान (उलवे) आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (पेण) यांचा समावेश आहे.
या पाच मैदानांवर सध्या दररोज उगवते क्रिकेटतारे आपली क्षमता आजमावत आहेत. त्यांच्या प्रत्येक षटकात, प्रत्येक धावेत आणि प्रत्येक चेंडूत महाराष्ट्र संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न दडलेले आहे. “रायगडचा रणसंग्राम” म्हणून ओळखली जाऊ लागलेली ही स्पर्धा केवळ जिल्हा निवड चाचणी नसून, भविष्यातील राज्यस्तरीय क्रिकेटचा पाया घालणारा उपक्रम ठरत आहे.
स्पर्धा प्रथम साखळी पद्धतीने आणि नंतर बाद फेरी पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतल्या खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अधिकृत संघ निवडला जाणार असून, हा संघ पुढे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित आंतरजिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सहभागी होईल.
या स्पर्धेला असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी भेट देऊन सर्व संघांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मते, “रायगडमधील ग्रामीण भागात असलेले क्रिकेटचे कौशल्य आता जिल्हास्तरीय व्यासपीठावर झळकू लागले आहे,” आणि हाच या स्पर्धेचा सर्वात मोठा विजय ठरणार आहे.

Related Articles

Back to top button