ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

सुडकोली–महान फाटा पूल धोक्यात; एसटी बंद—जनता त्रस्त! पर्यायी मार्ग तात्काळ सुरू करा, नाहीतर आंदोलन भडकणार!

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती  एम. एम. धायतडक  यांचे ८ दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
रायगड : अलिबाग–रोहा मार्गावरील सुडकोली पुल आणि रामराज नदीवरील महान फाट्याचा पूल हे आता अक्षरशः धोकादायक अवस्थेत ढासळण्याच्या मार्गावर आहेत. रस्त्याची तर इतकी दयनीय अवस्था आहे की खड्डे आणि रस्ता यात फरकच उरलेला नाही. या जीवघेण्या निष्काळजीपणामुळे वाहतूक बंद करण्यात आली असून, त्याचा सर्वात मोठा फटका नागरिकांना बसला आहे.
एस.टी. सेवा बंद झाल्याने विद्यार्थी, महिला, कामगार सगळ्यांचेच जगणे अवघड झाले आहे.
या भीषण परिस्थितीचा जाब मागण्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांना निवेदन वजा नोटीस देण्यात आली. सुडकोली व महान फाट्यावरील पूलांची तात्काळ दुरुस्ती, पर्यायी मार्गाची निर्मिती आणि एस.टी. सेवा तत्काळ पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती  एम. एम. धायतडक  यांनी ८ दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन दिले.
अलिबाग–रोहा मार्ग हा जनजीवनाशी निगडित महत्त्वाचा रस्ता. पण आज त्याची अवस्था पाहून एकच प्रश्न उभा राहतो, “लोकांचा जीव मोलाचा आहे का, की कागदपत्रे आणि निविदाच जास्त महत्त्वाच्या?”, सुडकोली पुलावर पोकळी, तडे, लोखंड बाहेर… जीव धोक्यात!, महान फाट्याचा पूल इतका जीर्ण की वाहतूक करणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण!
रस्त्यावर खड्डे की रस्ता खड्ड्यात—हेच ओळखू न येण्याइतकी दुर्दशा!
या सर्वांमुळे एस.टी. सेवा बंद झाली आणि प्रशासनाला वाटलं की “समस्या सुटली” पण प्रत्यक्षात जनतेची कोंडी, विद्यार्थ्यांचे शिक्षण, कामगारांची रोजीरोटी आणि महिलांचे सुरक्षित प्रवासाचे हक्क सगळंच उध्वस्त झाल आहे!
निवेदनकर्त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की “८ दिवसांत रस्ते-पूल दुरुस्त करा, पर्यायी मार्ग द्या, एस.टी. सेवा सुरू करा—नाहीतर तीव्र आंदोलन अनिवार्य!”
या आंदोलनात संतोष निगडे, पृथ्वीराज पाटील, ॲड. कौस्तुभ पुनकर, ॲड. अविनाश भगत, ॲड. महेश शिंदे, रमेश पाटील तसेच ग्रामस्थ व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांचा संताप उफाळलेला असून आता प्रशासनाला जाग येणे अत्यावश्यक आहे.
…….

Related Articles

Back to top button