ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“साहित्यविश्वचा सोळावा दिवाळी अंक वाचनसंस्कृतीचा दीप प्रज्वलित करणारा”  आमदार दळवींच्या हस्ते प्रकाशन संपन्न”


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग प्रतिनिधी : निसर्गरम्य राही गार्डन, कुरूळ येथे ‘साहित्यविश्व’ दिवाळी अंक २०२५ च्या सोळाव्या अंकाचे प्रकाशन लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. समाजाभिमुख विषयांना स्पर्श करणारा हा अंक वाचनसंस्कृती जपत असल्याचे गौरवोद्गार आमदार दळवी यांनी काढले.
व्यासपीठावरून बोलताना त्यांनी “साहित्यविश्व” अंकातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर विशेष भर देत संपादक प्रमिला जोशी यांच्या कार्याचे कौतुक केले. “दिवाळी अंकांच्या माध्यमातून नकळत कायदेविषयक जनजागृती घडते. अशा संपादकांचा सन्मान करणे आणि त्यांच्या परंपरेला शासनाने प्रोत्साहन द्यावे, यासाठी मी प्रयत्न करीन,” असे आश्वासन त्यांनी दिले.
यानिमित्ताने त्यांनी रेवस–करंजा सागरी महामार्ग, साळाव पूल, सांबरकुंड धरण आणि मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. “अलिबागचा विकास झपाट्याने होत असला, तरी स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीचे जतन करावे,” असेही त्यांनी कळकळीचे आवाहन केले.
कार्यक्रमात साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ सुजाता पाटील, फौजदारी वकील व साहित्यिक ॲड. विलास नाईक, गझलकार व माजी सनदी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी आपल्या मनोगतात दिवाळी अंकातील लेखांचे वाचनसंस्कृतीसाठीचे योगदान अधोरेखित केले.
या सोहळ्यास द्वारकानाथ नाईक, ॲड. प्रसाद पाटील, रमेश धनावडे, प्रमिला जोशी, ॲड. प्रवीण ठाकूर, ॲड. अंकित बंगेरा, महेश कवळे, नागेश कुलकर्णी, सुभाष म्हात्रे, धीरज जोशी, कल्पना पाटील, ॲड. कविता ठाकूर, ॲड. वैशाली बंगेरा, रोहित पाटील, श्याम जोगळेकर, जय जोशी, ॲड. जीविता पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कवळे यांनी तर आभार प्रदर्शन रमेश धनावडे यांनी केले.

Related Articles

Back to top button