क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्ररायगड

साखळी फेरीत रायगड, नाशिक आणि वायएमसीएची दणदणीत घोडदौड

अभिषेक खातूची ८ बळींची भेदक गोलंदाजी; नाशिककडून ४२८ धावांचा डोंगर, वायएमसीएचा पहिल्या डावावर विजय


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग  |

महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशन आयोजित वरिष्ठ गटाच्या दोन दिवसीय पुरुष क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि वायएमसीए क्रिकेट क्लब, पुणे या संघांनी दमदार विजय मिळवत आपली घोडदौड कायम राखली. रायगड जिल्ह्यातील विविध मैदानांवर झालेल्या या सामन्यांमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
बेलापूर येथील सिडको मैदानावर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने सेंट्रल विभाग संघावर एक डाव आणि ६० धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सेंट्रल विभाग संघाचा पहिला डाव १०६ धावांत संपुष्टात आला. रायगडचा युवा जलदगती गोलंदाज अभिषेक खातू यांनी भेदक मारा करत तब्बल ८ फलंदाज बाद केले. प्रत्युत्तरात रायगडने पहिल्या डावात ९ गडी गमावत ३१२ धावा करून डाव घोषित केला. कर्णधार रवी सोलंकी यांनी ५१ तर श्रेयस कुमार यांनी ४१ धावांचे योगदान दिले. २०६ धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात सेंट्रल विभाग संघ १४६ धावांत बाद झाला. कौस्तुभ म्हात्रे यांनी ४, आर्यन देशमुख यांनी ३ तर अभिषेक खातू यांनी २ फलंदाज बाद करत रायगडचा विजय निश्चित केला.
गव्हाण-उलवे येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने सेंट्रल डिफेन्स अकादमी, पुणे संघावर एक डाव आणि ७५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सेंट्रल डिफेन्स अकादमीचा संघ १९१ धावांत बाद झाला. त्यानंतर नाशिकने दमदार फलंदाजी करत ६ गडी गमावत तब्बल ४२८ धावांचा डोंगर उभारला. रवींद्र मॅचा आणि अभिजित पवार यांनी प्रत्येकी १४० धावांची शानदार शतकी खेळी साकारत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले. दुसऱ्या डावात सेंट्रल डिफेन्स अकादमीचा संघ १६२ धावांत गारद झाला आणि नाशिकचा डावाने विजय निश्चित झाला.
पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या सामन्यात वायएमसीए क्रिकेट क्लब, पुणे संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना वायएमसीए संघ २८५ धावांवर सर्वबाद झाला. नित्या लुनकड यांनी १२८ धावांची शतकी खेळी करत संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. क्लब ऑफ महाराष्ट्रकडून केदार बजाज यांनी ४ फलंदाज बाद केले. प्रत्युत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्र संघ २०६ धावांत बाद झाला. वायएमसीएकडून स्वराज वाबळे यांनी ६ फलंदाज बाद करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व इतर पदाधिकारी आणि सदस्य यांनी मैदानावर उपस्थित राहून सर्व खेळाडूंना उत्कृष्ट खेळाबद्दल शुभेच्छा दिल्या. या साखळी फेरीतील विजयांमुळे रायगड, नाशिक आणि वायएमसीए संघांनी स्पर्धेत आपले आव्हान अधिक भक्कम केले आहे.


Related Articles

Back to top button