ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

सहकाराची ताकद दाखवणारी रायगड बँक : १०,००० कोटींचा टप्पा गाठण्याचा निर्धार

रायगड जिल्हा बँकेचा नवा टप्पा : ३५.५९ कोटी नफा, सभासदांना १२.५% लाभांश


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६४वी वार्षिक सर्वसाधारण सभा अलिबाग येथील केंद्र कार्यालयात उत्साहात पार पडली. बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आर्थिक वर्ष २०२४–२५ चे निकाल जाहीर करताना सांगितले की, बँकेस ८५.८० कोटी रुपये ढोबळ नफा तर ३५.५९ कोटी रुपये निव्वळ नफा मिळाला असून, सभासदांना १२.५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वनिधी ७०० कोटींचा टप्पा
बँकेच्या स्वनिधीने ७०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. येत्या काळात हा निधी २०३० पर्यंत १००० कोटींवर नेण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
‘मिशन २०२८’ : १०,००० कोटींचा व्यवसाय
बँकेच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीचा आढावा घेत पाटील म्हणाले, “संपूर्ण जगभरात या वर्षी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे होत आहे. सहकाराच्या बळावर आम्ही ‘मिशन २०२८’ अंतर्गत दोन महत्वाकांक्षी ध्येये समोर ठेवली आहेत –
स्वनिधी १००० कोटी
व्यवसाय १०,००० कोटी
यासाठी सीईओ मंदार वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली पाच वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती गठित करण्यात आली असून, हा टप्पा वेळेपूर्वीच गाठू, असा विश्वास आहे.”
व्यवसायात दुपटीने वाढ
गेल्या चार वर्षांत बँकेच्या व्यवसायात दुपटीने वाढ झाली आहे. जुलै २०२५ अखेर व्यवसाय ६६०० कोटी रुपयांहून अधिक झाला असून, चालू आर्थिक वर्षअखेर तो ७००० कोटींवर जाईल. पुढील दोन वर्षांत १०,००० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा ठाम विश्वास अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्तक आणि सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
पुरस्कार व गौरव
उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी बँकेला मिळालेल्या दोन राष्ट्रीय पुरस्कारांची माहिती दिली. तसेच, बँक असोसिएशनतर्फे सीईओ मंदार वर्तक यांना मिळालेल्या ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले.
सीईओ मंदार वर्तक यांनी आपल्या मनोगतात बँकेच्या ऐतिहासिक यशांचा आढावा घेतला. नाबार्ड अध्यक्ष के. व्ही. शाजी यांच्या उपस्थितीत बँकेने सहकारी सेवा संस्थांच्या संगणकीकरण प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी केली. यामुळे भारतातील पहिली सहकारी बँक म्हणून रायगड बँकेला सन्मान मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
मागील २० वर्षांपासून बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असल्याची परंपरा यावर्षीही कायम राखण्यात आली. नव्या संगणकप्रणालीमुळे अधिक वेगवान आणि गतिमान सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे वर्तक यांनी सांगितले.
कर्तृत्वाचा सन्मान
सभेत जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला.
मापगाव-अलिबाग – अध्यक्ष संदेश थळे
वशेणी-उरण – अध्यक्ष प्रभाकर जोशी
खारआंबोळी-मुरुड – अध्यक्ष तुकाराम पाटील
चणेरा-रोहा – अध्यक्ष गोपीनाथ गंभे
म्हसळा – अध्यक्ष विनायक गिजे
पाली-उपग्राम-सुधागड – अध्यक्ष गजानन शिंदे
याशिवाय, गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या दुर्ग रक्षक सामाजिक संस्था (अलिबाग), क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणारी श्रमिका श्रीधर पाटील (महाजने, अलिबाग), १५० किल्ले सर करणारी गिर्यारोहिका शर्विका म्हात्रे (लोणारे, अलिबाग) व तिचे आई-वडील, उद्योजकतेत उदयास आलेले सागर नाईक (नागाव, अलिबाग), कला क्षेत्रात नाव कमावलेले निलेश निवाते (महाड), शिक्षण व सामाजिक कार्यात योगदान देणारे संतोष शिंगाडे (सारसई, पनवेल) आणि सहकार क्षेत्रात अग्रणी ठरलेल्या निलम कदम (कोलाड, रोहा) यांचा विशेष गौरव करण्यात आला.

Related Articles

Back to top button