‘श्रीमती गीता तटकरे नर्सिंग कॉलेज’च्या उद्घाटनात उपमुख्यमंत्र्यांना विश्वास: “शिक्षण-आरोग्यासाठी भरीव पावले”

रायगड : जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य आणि शिक्षण सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यासाठी भरीव पावले उचलली जात आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंग च्या नामकरण व उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “माणगाव तालुक्यात नर्सिंग कॉलेजसारखी अद्ययावत सुविधा उभी राहणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षणाचे एक नवे दालन ठरणार आहे. या संस्थेला खासदार सुनील तटकरे यांच्या मातोश्रींचे नाव देण्यात आले असून त्यांच्या नावाला साजेसं कार्य या महाविद्यालयातून घडावं, ही अपेक्षा आहे.”
खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “रायगड जिल्ह्यात शिक्षणाचे हब तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औद्योगिकीकरण वाढत असून स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी अशा शैक्षणिक संस्था उपयुक्त ठरणार आहेत. शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी लागणारा निधी शासनाकडून दिला जाईल.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. राजू साबळे यांनी केले. यावेळी माणगावमधील नागरिक, कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.