श्रमदानातून जलक्रांती : रायगडमध्ये एकाच दिवशी ७७८ वनराई बंधारे; ग्रामस्थांच्या सहभागातून पाण्याचा शाश्वत मार्ग
वेग, नियोजन आणि श्रमदानाचा संगम; रायगडमध्ये तासाला ९० वनराई बंधारे

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : प्रशासनाचे नियोजन आणि ग्रामस्थांची मेहनत यांची सांगड घालत रायगड जिल्हा मध्ये जलसंधारणाची एक सकारात्मक चळवळ उभी राहत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत बुधवारी (ता. ७) जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी एकत्र येत एकाच दिवशी ७७८ ठिकाणी वनराई बंधारे उभारून श्रमदानातून जलसमृद्धीचा संदेश दिला. जिल्हाभरात एका तासाला सरासरी ९० च्या आसपास वनराई बंधारे उभारले गेल्याने रायगडमध्ये जलसंधारणाची अभूतपूर्व गती दिसून येत आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या योजनेला लोकसहभागाची जोड मिळाली. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, शेतकरी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने श्रमदानात सहभागी झाले. पावसाळ्यापूर्वीच पाण्याचे साठे निर्माण व्हावेत, भूजल पातळी वाढावी आणि शेतीला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्हाभर यशस्वी झाला. महाड व पोलादपूर तालुक्यांतील वनराई बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाने कामाच्या गुणवत्तेवर भर दिला. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत जलसंधारण ही केवळ योजना नसून ग्रामविकासाची दीर्घकालीन गुंतवणूक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
जिल्ह्यातील ८११ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे महाड, पेण, पनवेल, रोहा यांसारख्या तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर बंधारे उभारले गेले, तर काही तालुक्यांत मर्यादित संख्येने काम झाले असले तरी पुढील टप्प्यात ती वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शासनाने अभियानाची मुदत वाढविल्याने आता उर्वरित ग्रामपंचायतींनाही जलसंधारणाच्या या चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे. श्रमदानातून उभारलेले हे वनराई बंधारे केवळ पाणी अडवणार नाहीत, तर ग्रामस्थांमध्ये स्वावलंबन आणि पर्यावरण जपण्याची जाणीव अधिक बळकट करतील, असा विश्वास प्रशासन व्यक्त करत आहे.
———–
तालुका वनराई बंधा-यांची संख्या
1. अलिबाग 62
2. कर्जत 59
3. खालाूपर 44
4. महाड 83
5. माणगाव 57
6. म्हसळा 39
7. मुरूड 50
8. पनवेल 70
9. पेण 72
10. पोलादपूर 33
11. रोहा 61
12. श्रीवर्धन 39
13. सुधागड 36
14. तळा 39
15. उरण 4
एकूण ग्रामपंचायती: 811
एकूण वनराई बंधा-यांची संख्या: 778




