ताज्या बातम्यारायगड
शेकापचा लाल वणवा महावितरणच्या दारात पेटला – आठ दिवसांत उत्तर नाही, तर संघर्ष!
सामान्य जनतेच्या विजबिल लुटीविरोधात शेकापचा एल्गार – ‘आता पुरे!’ म्हणत ठिय्या आंदोलन

रायगड : रायगडसह अलिबाग परिसरात कोणतीही पूर्वसूचना, परवानगी किंवा लोकसंवाद न करता महावितरणकडून सक्तीने स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. परिणामी सामान्य नागरिकांवर विजेच्या बिलाचा भडिमार सुरू असून, नागरिक संतप्त झाले आहेत. याच अन्यायाच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) अलिबागमधील चेंढरे येथील महावितरणच्या कार्यालयावर थेट हल्लाबोल करत प्रशासनाला हादरवून सोडले.
शेकापचा एल्गार – झेंडे, घोषणांनी महावितरण कार्यालय ठणाणलं
शेकाप राज्य महिला आघाडीच्या प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था लाल झेंड्यांसह रस्त्यावर उतरला. “स्मार्ट मीटर हटाव”, “सामान्य जनतेची आर्थिक लूट बंद करा”, “महावितरणचा खाजगीकरण कट हाणून पाडू”, अशा प्रखर घोषणा देत चेंढरे येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
अधिकारी गैरहजर, कार्यकर्ते संतप्त – ठिय्या आंदोलनाची चेतावणी
मोर्चा थेट अतिरिक्त कार्यकारी अभियंता तायडे यांच्या कार्यालयात घुसला. मात्र संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. “जोपर्यंत आमच्या मागण्यांवर लेखी आश्वासन दिलं जात नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही,” असा निर्वाणीचा इशारा ॲड. म्हात्रे यांनी दिला.
मागण्या ठाम – मीटर हटवा, बिले रद्द करा, लूट थांबवा
– स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती थांबवा
– आधीच बसवलेले मीटर काढा
– वाढीव व भरमसाठ वीजबिले रद्द करा
– खाजगीकरणाचा कट बंद करा
– जनतेवर होणारी आर्थिक पिळवणूक थांबवा
या मागण्यांचे निवेदन अधिक्षक अभियंता धनराज बिक्कड यांना देण्यात आले. परंतु अधिकारी वेळकाढूपणा करत असल्याचे लक्षात येताच, शेकाप कार्यकर्त्यांनी ‘शेकाप स्टाईल’ने अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
शासनाची झोप उडाली – लेखी आश्वासन मिळालं
शेकापच्या आक्रमक आणि रेट्याच्या आंदोलनानंतर महावितरण प्रशासनाची झोप उडाली. अखेर अतिरिक्त कार्यकारी अभियंता तायडे यांनी आठ दिवसांच्या आत मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन देऊन आंदोलन थांबवले.
पण इशारा स्पष्ट – अन्याय सुरू राहिला, तर लढा पुन्हा उभारू!
शेकापने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर वेळेत कार्यवाही झाली नाही, तर लढा पुन्हा अधिक आक्रमकपणे उभारला जाईल. “सामान्य जनतेच्या हक्कासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत,” असे ॲड. मानसी म्हात्रे यांनी ठणकावून सांगितले.
….