शिवसैनिकांचा पाकिस्तानविरोधी ज्वालामुखी फुटला; ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलनाने महाराष्ट्र पेटला

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा काळा चेहरा पुन्हा उघड झाला आहे. अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळणं म्हणजे शहिदांच्या रक्ताशी गद्दारी असल्याचा जाज्वल्य सूर महाराष्ट्रभर घुमू लागला आहे. या संतापाच्या ज्वालामुखीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी ‘माझं कुंकू माझा देश’ या आंदोलनातून आक्रोशाचा जाळ राज्यभर पेटवून दिला आहे.

अलिबागमध्ये झालेल्या निदर्शनांत महिला आघाडी अग्रभागी उभी राहिली. पाकिस्तानविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला. भाजप कार्यालयासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनात शिल्पा घरत, दर्शना पाटील, तनुजा पेरेकर, राजश्री मिसाळ, लीना घरत, राखी खरवले, रूपाली म्हात्रे, मनाली पाटिल, जागृती पिटकुर, संचिता भोईर, सलोनी गिरी यांसारख्या महिला नेतृत्वाने आघाडी घेत भाजपविरोधी आक्रमण चढवलं.
रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी मोर्चा काढला. “भारत माता की जय”, “पाकिस्तान मुर्दाबाद”, “माझं कुंकू माझा देश” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. संतप्त शिवसैनिकांनी पाकिस्तानविरोधी लढ्याचा ठाम इशारा दिला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कठोर शब्दांत भूमिका स्पष्ट केली – “पाकिस्तान हा दहशतवादाचा जनक आहे. अशा देशाशी क्रिकेट खेळणे म्हणजे शहिदांच्या बलिदानावर पाय ठेवणं आहे. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोवर भारताने त्यांच्याशी सामना खेळलाच तर तो अपमान ठरेल. केंद्र सरकारने आता निर्णायक भूमिका घ्यावी, हे देशाच्या सन्मानाशी निगडित प्रकरण आहे.”

राज्यात पेटलेलं ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलन ही केवळ निदर्शने नसून शहिदांच्या बलिदानासाठीचा जाज्वल्य हुंकार आहे. अलिबागमधून उठलेला हा आक्रोश देशभर पाकिस्तानविरोधी ठाम संदेश पोहोचवणारा ठरला आहे.




