ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

शब्दांचा शिल्पकार हरपला; ज्येष्ठ पत्रकार मधुकर हातकमकर यांच्या निधनाने हळहळ

रायगड पत्रकारितेतील एक अभ्यासू दीप मालवला


रायगड  : जिल्ह्यात अर्धशतकाहून अधिक काळ पत्रकारितेची निःस्वार्थ सेवा करणारे ज्येष्ठ पत्रकार मधुकर दगडू हातकमकर (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने २ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्याच्या पत्रकारिता, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात एक सुसंस्कृत, मार्गदर्शक आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

महाराष्ट्र टाइम्स या राज्यातील प्रतिष्ठित वृत्तपत्रात त्यांनी सुमारे ४० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली. हातकमकर सर केवळ पत्रकार नव्हते, तर पत्रकारांच्या पाठीवर मायेची थाप देणारे, मार्गदर्शन करणारे आणि नवख्या पत्रकारांच्या हातात लेखणी आत्मविश्वासाने देणारे खरे “गुरु” होते.

त्यांचे योगदान केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित नव्हते. मेहेंदळे हायस्कूल तसेच सुधागड एज्युकेशन सोसायटी, कोलाड येथे त्यांनी शिक्षक म्हणून कार्य केले. रोहेजवळील धाटाव शाळेत मुख्याध्यापक, तर मेहेंदळे हायस्कूलमध्ये एनसीसी कमांडर म्हणूनही जबाबदारी सांभाळली.

पत्रकारितेतील त्यांच्या कार्याची दखल घेत भालाकर-भोपटकर आणि डहाणूकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ते रोहा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही सक्रिय होते.

मधुकर हातकमकर यांचं निधन ही केवळ पत्रकारितेची हानी नसून, एक सजग मार्गदर्शक, सुसंस्कृत विचारवंत आणि माणुसकीचा मोठा आधार गमावल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे. अनेक पत्रकार, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि सहकारी त्यांच्या आठवणीने व्यथित झाले आहेत.

सत्य, सुसंस्कार आणि शब्दशक्ती यांचे मूर्तिमंत उदाहरण असलेले मधुकर हातकमकर आज आपल्या पंचतत्वात विलीन झाले. त्यांच्या स्मृतीस रायगड जिल्हा कधीही विसरणार नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button